मुंबईत २१ हजार नवीन रुग्ण
रुग्णवाढीचा दर वाढला; रुग्ण दुपटीचा दरही ५६ दिवसांवर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : मुंबईत आज २०,९७१ कोरोनाच्या नवीन रुग्णांची भर पडली. त्यापैकी १७,६१६ (८४ टक्के) रुग्ण लक्षणे विरहित आहेत. नवीन रुग्णांपैकी १,३९५ रुग्णांना (६.६५ टक्के) रुग्णालयात दाखल करण्यात आले; तर आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी ६,५३१ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर ८७ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. कोरोना रुग्णवाढीचा दर वाढून १.२३ टक्के झाला आहे. रुग्ण दुपटीचा दरही ५६ दिवसांपर्यंत खाली आला आहे.
आज सापडलेल्या बाधित रुग्णांपैकी केवळ ८८ रुग्णांना ऑक्सिजन बेडवर दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत २,३८५ रुग्णांना ऑक्सिजन बेडवर उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुंबईत एकूण ८,७४,७८० पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील ५,८९,१२० (६७.३४ टक्के) रुग्ण लक्षणे विरहित आहेत. एकूण उपलब्ध रुग्णशय्यांपैकी १८.३ टक्के रुग्णशय्या भरल्या आहेत.
आज ८,४९० रुग्ण कोरोनातून बरे झाले असून आतापर्यंत ७,६४,०५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या ७,९१,७३१ सक्रिय रुग्ण आहेत. मृतांचा आकडा वाढला असून आज ६ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण रुग्णांचा आकडा १६,३९४ वर पोहोचला आहे. आज ७२,४४२ चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत १,४०,६४,५३७ चाचण्या करण्यात आल्या आहेत.
चौकट
कंटेन्टमेंट झोन - ६
सीलबंद इमारती - १२३
२४ तासांतील सहवासितांचा शोध - ३४,१९०
अति जोखमीचे सहवासित - ५४२