राज्यातील ३९३ डॉक्टरांना कोरोना
सर्वांना सौम्य लक्षणे; विलगीकरण कालावधी पूर्ण झाल्यावर कामावर रुजू होणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : राज्यात वेगाने पसरणाऱ्या कोरोनाच्या विळख्यात डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी सापडू लागले आहेत. पालिका तसेच खासगी रुग्णालयांतील अनेक डॉक्टरांना कोरोनाच संसर्ग झाला आहे. यात निवासी डॉक्टरांची मोठी संख्या आहे. राज्यात ३९३ निवासी डॉक्टरांना कोरोना झाला असून या सर्व डॉक्टरांना सौम्य लक्षणे आहेत. यातील काही डॉक्टर लवकरच सात दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करून कामावर रुजू होतील.
राज्यातील जे. जे रुग्णालय, नायर रुग्णालय, सायन, केईएम, ठाणे, धुळे, कुपर, पुण्यातील ससून रुग्णालय, मिरज, लातूर, औरंगाबाद आणि नागपूर येथील निवासी डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अशा परिस्थितीत काही रुग्णालयांमध्ये ओपीडी तसेच सर्जरी विभागातील सेवा, यासह इलेक्टिव्ह सर्जरीस टप्प्याटप्याने कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संसर्ग नियंत्रणात येईपर्यंत तसेच मनुष्यबळाची पूर्ववत उपलब्धता होईपर्यंत हे विभाग पूर्ण क्षमतेने काम करणार नाहीत, असेही सांगितले जात आहे.
जेजे रुग्णालयातील डाॅक्टर्स सर्वाधिक पाॅझिटिव्ह -
राज्यातील इतर रुग्णालयांच्या तुलनेत मुंबईतील जे. जे. रुग्णालयातील डाॅक्टर्स सर्वाधिक पाॅझिटिव्ह आले आहेत. जे. जे. रुग्णालयातील १०० निवासी डॉक्टर्स पाॅझिटिव्ह असून सायन रुग्णालयातील ९८ आणि केईएम रुग्णालयातील ९५ डाॅक्टर्स पाॅझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, शुक्रवारी जे. जे. रुग्णालयात ९२ डाॅक्टर्स पाॅझिटिव्ह नोंदले गेले होते. त्यात ८ डाॅक्टरांची भर पडून आकडा १०० वर पोहोचला आहे. केईएममध्ये ७० डाॅक्टरांवरून बाधित डॉक्टरांची संख्या ९५ झाली आहे.
जे. जे. रुग्णालय - १००
लातूर - १
यवतमाळ - १
धुळे - ८
मिरज - २
एचबीटीएमसी आणि डॉ. आर एन कूपर हॉस्पिटल - ७
नागपूर - १
जीएमसी औरंगाबाद- ३
केईएम मुंबई - ९५
सायन - ९८
ठाणे - १०
सोलापूर - २
कोल्हापूर - ००
बीजेजीएमसी, पुणे - १०
नांदेड - २
पिंपरी - ६
नायर - ४५