ट्रामा केअर रुग्णालय कोरोनासाठी राखीव नको
गोरेगाव रिपब्लिकन पक्षाची मागणी
गोरेगाव, ता. ९ (बातमीदार) ः बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर रुग्णालय कोरोनासाठी राखीव ठेवण्याच्या निर्णयाला गोरेगाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी अन्य सर्व आजारांसाठी ठाकरे रुग्णालयात उपचार मिळायला हवेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर असलेले जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर रुग्णालय प्रशासनाने ७ जानेवारीला पत्रक काढून संपूर्णपणे कोरोनासाठी समर्पित करत असल्याचा व रुग्णालयातील अपघात, बाह्यरुग्ण, शस्त्रक्रिया विभाग पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गोरेगाव जोगेश्वरीतील नागरीकांसाठी हेच एकमेव रुग्णालय असताना प्रशासन हा निर्णय कसा घेऊ शकते, विभागातील विविध आजारांनी त्रस्त असलेल्या रहिवाशांना उपचारासाठी कोठे जायचे, असा सवाल त्यांनी विचारला आहे. सद्यपरिस्थितीत किती कोविड रुग्ण ट्रामा केअर रुग्णालयमध्ये दाखल आहेत याची ही माहिती रुग्णालय प्रशासनाने नागरिकांना देण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे गोरेगावच्या रिपाइं नेत्यांनी ठाकरे ट्रॉमा रुग्णालयात भेट देऊन वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.
...