मुलाच्या कंत्राटाविषयी माहिती नाही
महापौर किशोरी पेडणेकर यांचे प्रतिउत्तर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : कोरोनाच्या वाढत्या रुग्णांबरोबर आता पुन्हा आरोप-प्रत्यारोपांची तिसरी लाट उसळू लागली आहे. वरळी येथील कोविड केंद्राचे कंत्राट महापौर किशोरी पेडणेकर यांच्या पुत्राला मिळाले असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. या आरोपांना महापौर पेडणेकर यांनी उत्तर दिले असून सोमय्या हे विचाराने भरकटलेले आहेत. ते हळूच कोणतीतरी गोळी खातात. ती गोळी बहुधा नैराश्येची असावी, असा प्रतिहल्ला चढवत मुलाच्या कंत्राटाबाबत आपल्याला माहिती नसल्याचे महापौरांनी नमूद केले.
सोमय्या यांनी शनिवारी मुंबईतील काही जम्बो कोविड केंद्रांची पाहणी करून त्यातील भ्रष्टाचार उघड करण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर आज महापौरांच्या पुत्राला वरळी डोम येथील कोविड केंद्राचे कंत्राट मिळाले असल्याचा आरोप त्यांनी केला. या कोविड केंद्राचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावरून महापौरांनी तात्काळ प्रतिउत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आठवड्यातून दोन वेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर बैठक घेऊन कोविडच्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत. त्यांना तिसऱ्या लाटेचे गांभीर्य आहे. पण राज्यातील भाजपच्या नेत्यांना ते गांभीर्य समजत नाही, असा टोला लगावला. मी माझ्या कामात व्यस्त असते. मुलाच्या कंत्राटाबाबत माहिती नाही, असेही त्यांनी नमूद केले. सोमय्या यांना राजकीय बाळकडूची गोळी कमी पडली. त्यामुळे आता ते कोणती गोळी घेतात, हे माहीत नाही. ते भरकटले आहेत, असा टोला महापौरांनी लगावला.