कोरोनाबाधित रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्या वाढती
पश्चिम रेल्वेवर ५००, तर मध्य रेल्वेवर २०० रुग्ण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : कोरोनाबाधित रेल्वे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पश्चिम रेल्वेमध्ये सुमारे ५००, तर मध्ये रेल्वेमध्ये कुटुंबीयांसह सुमारे २०० अधिकारी, कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. रेल्वेच्या काही विभागांत दिवसाआड कामांवर येण्याच्या आणि वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांना अद्याप अशाप्रकारे सूचना मिळाल्याने कोरोनाचा प्रसार होण्याची भीती रेल्वे कर्मचाऱ्यांद्वारे व्यक्त केली जात आहे.
कोरोनाचे सावट पुन्हा वाढू लागले आहे. मुंबईत दरदिवशी हजारोंच्या संख्येने कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे राज्य सरकारद्वारे सरकारी आणि खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होम आणि दिवसाआड काम करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, अद्याप रेल्वेचे काही विभाग सोडल्यास उर्वरित सर्व विभागांत १०० टक्के कर्मचारी वर्ग काम करत आहे. परिणामी, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होत आहे. सध्या रेल्वेच्या प्रत्येक वर्कशॉप, विभागात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाची बाधा होत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने नवीन नियमावली जाहीर करणे आवश्यक आहे.
रेल्वे कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय मिळून मध्य रेल्वेमध्ये सुमारे २०० कोरोना बाधित आणि पश्चिम रेल्वेवर सुमारे ५०० कोरोना बाधित आहेत. सध्या पश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम रुग्णालयात ५७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. इतर रुग्ण रुग्णालयात, होम आयसोलेशनमध्ये आहेत, अशी माहिती रेल्वेमधील सूत्रांनी दिली.