नव्या रुग्णांचा आकडा स्थिर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : तीन दिवसांपासून मुंबईत २० हजाराच्या आसपास रुग्ण सापडत असून रुग्णसंख्या स्थिरावल्याचे दिसते. आज १९,४७४ नवीन रुग्णांची भर पडली. त्यापैकी १५,९६९ (८२ टक्के) रुग्ण लक्षणेविरहित आहेत. नवीन रुग्णांपैकी १२४० रुग्णांना (६.३६ टक्के) रुग्णालयात दाखल करण्यात आले; तर आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी ७४३२ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर ८५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. कोरोना रुग्णवाढीचा दर वाढून १.६६ टक्के झाला आहे; तर रुग्णदुपटीचा दरही ४१ दिवसांपर्यंत खाली आला आहे. मुंबईत दैनंदिन बाधित रुग्ण वाढत असल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा आज १,१७,४३७ वर पोचला आहे.
मुंबईत रुग्ण दगावण्याचे प्रमाण किंचित वाढले असून आज सात रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण रुग्णांचा आकडा १६,४०६ वर पोचला आहे. आज ६८,२४९ चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत १,४२,०३,८०५ चाचण्या करण्यात आल्या आहेत. आज ८०६३ रुग्ण कोरोनातून बरे झाले असून आतापर्यंत ७,७८,११९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आज सापडलेल्या बाधित रुग्णांपैकी ११८ रुग्णांना ऑक्सिजन बेडवर दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत ३०३५ रुग्णांना ऑक्सिजन बेडवर उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. मुंबईत आतापर्यंत ९,१४,५७२ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील ६,२१,७५० (६७.९८ टक्के) रुग्ण लक्षणेविरहित आहेत. एकूण उपलब्ध रुग्णशय्यांपैकी २१.३ टक्के रुग्णशय्या भरल्या आहेत.
...
सक्रिय प्रतिबंधक क्षेत्र- १७
सक्रिय सीलबंद इमारती- १२३
२४ तासांतील संपर्कांचा शोध- ३९,८०४
अतिजोखमीचे संपर्क- ५४२