जाहिरात होर्डिंग्जची अवघी चार कोटींचीच वसुली
मिरा-भाईंदर महापालिका होर्डिंग्ज कापण्याची मोहीम
भाईंदर, ता. १० (बातमीदार) : मिरा-भाईंदर महानगरपालिका आपले उत्पन्न वाढवण्यासाठी विविध मार्ग शोधत आहे; मात्र दुसरीकडे अपेक्षेप्रमाणे थकबाकी वसुली झाली नसल्याचे चित्र आहे. शहरात सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात आलेल्या होर्डिंग्जच्या माध्यमातून महापालिकेला ४० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे; मात्र थकबाकीची वसुली करण्यात अपयश आल्याने अवघे चार कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. अखेर पालिका प्रशासन थकबाकीदारांचे होर्डिंग्ज कापण्याची मोहीम हाती घेणार असल्याचे सांगितले.
कोरोनामुळे महापालिकेची आर्थिक कोंडी झाली असून उत्पन्नवाढीवर विशेष भर देण्यात येत आहे. थकबाकी वसुली करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत, परंतु शहरातील होर्डिंग्जधारकांकडून ४० कोटी रुपयांच्या थकबाकीपैकी फक्त चार कोटी रुपयांचीच वसुली होऊ शकली आहे. शहरातील होर्डिंग्जवर जाहिरात करण्यासाठी महापालिकेकडे शुल्क भरावे लागते; मात्र गेल्या दोन वर्षांपासून बहुतांश खासगी होर्डिंग्ज मालकांनी, तसेच पालिकेचे होर्डिंग्ज भाड्डेपट्ट्याने घेतलेल्या काही ठेकेदारांनी शुल्क भरणे थांबवले आहे. महापालिकेने निश्चित केलेले होर्डिंग्जचे दर इतर महापालिकेच्या तुलनेत खूपच जास्त असल्याची तक्रारही या होर्डिंग्जमालकांची होती.
अनेकांनी थकबाकी न भरल्यामुळे महापालिकेने दोन वर्षांपूर्वी खासगी होर्डिंग्ज तोडण्याची कारवाई सुरू केली होती, परंतु होर्डिंग्जमालकांनी नगरविकास मंत्र्यांकडे धाव घेऊन या कारवाईवर स्थगिती मिळवली होती. ही स्थगिती अद्याप कायम असून नगरविकास विभागाने त्यावर कोणताही निर्णय न घेतल्याने जाहिरातदारांचे चांगलेच फावले आहे.
नगरविकास विभागाकडून थकबाकीबाबत कोणताही निर्णय होत नसल्याने महापालिकेने आपल्या स्तरावर थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. उर्वरित ३६ कोटी रुपयांची थकबाकी भरण्यासाठी ठेकेदार, जाहिरातदारांशी बैठकही घेण्यात आली आहे; मात्र त्यानंतरही फारशी प्रगती झालेली नाही.
कोट
थकबाकी भरण्याबाबत जाहिरातदारांना वारंवार नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आता अखेरचा उपाय म्हणून पुढील आठवड्यापासून थकबाकीदारांचे होर्डिंग कापण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
- अजित मुठे, उपायुक्त, मिरा-भाईंदर महानगरपालिका
चौकट
खासगी होर्डिंग्ज मालकी- ६३
महानगरपालिकेची मालकी- १५३
एकूण होर्डिंग्ज- २१६