अनलॉकनंतर रातवडमध्ये फुलली परसबाग
फळभाज्या उत्पादनाच्या विक्रीमुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित
माणगाव, ता. १० (बातमीदार) : कोरोनाकाळात बंद असलेल्या शाळा उघडल्यानंतर माध्यमिक विद्यामंदिर रातवड शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांत सहभाग घेतला. यात त्यांनी शाळेच्या परिसरात भाजीपाला लागवड केली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत असून शेती आधारित उपक्रमांना चालना मिळत आहे. फळभाज्यांचे उत्पादन सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळा उपक्रमांतर्गत भाजीपाला लागवड केली आहे. अनलॉकनंतर शाळा भरताच विद्यार्थ्यांनी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मदतीने शालेय परिसरात मेथी, दुधी भोपळी, वांगी, शिराळी, कोथिंबीर, तोंडली इत्यादी फळभाज्यांचे उत्पादन घेतले आहे. या बागेत तयार होणारा भाजीपाला शालेय परिसरात विक्री केला जात आहे. शाळेतील शिक्षक, कर्मचारी, पालक व नागरिक हा भाजीपाला विकत घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत आहेत. विद्यार्थी व शिक्षक यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
विद्यालयाने शालेय परिसराचा उपयोग करून यापूर्वीही भाजीपाला लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक महादेव जाधव यांच्या मार्गदर्शनाने विद्यालय परिसरात भाजीलागवड करण्यात आली. रोपांची योग्य निगा राखण्यात आली. भाजीपाला लागवड यशस्वी करण्यासाठी शिक्षक बी. के. काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांना शिपाई प्रदीप लांगी यांनी साह्य केले. शाळेत लागवड केलेली भाजी उत्पादन सुरू झाल्याने विद्यार्थी आनंदित झाले असून त्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.
-----------------------------------------------------------------------------
शाळेत विविध उपक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांना शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा हेतू आहे. भाजीपाला लागवडीतून विद्यार्थ्यांना शेतीचा अनुभव मिळावा हा हेतू आहे. भाजी उत्पादन झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा आनंद वाढला आहे. हा भाजीपाला शाळेत विक्री केला जातो.
- बी. के. काळे, उपक्रमशील शिक्षक
-----------------------------------------------------------------------------
शाळेच्या परिसरातील भाजीपाला लागवडीत आम्ही मदत करतो. शेतीकामाचा एक वेगळा अनुभव घेतला आहे. परसबागेत काम करताना आम्हाला आनंद मिळतो. विविध रोपलागवड कशी करायची यातून शिकत आहोत.
- सृष्टी मरवडे, विद्यार्थिनी, दहावी
-----------------------------------------------------------------------------
विद्यार्थ्यांनी राबवलेला हा उपक्रम अतिशय उपयुक्त आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शेतीचे ज्ञान मिळत आहे. प्रत्यक्ष अनुभवातून मिळणारे हे ज्ञान त्यांना पुढील काळात निश्चित उपयोगी पडेल. हा भाजीपाला विकत घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत आहोत.
- गणेश महाडीक, शिक्षणप्रेमी
फोटोओळ-
माणगाव : शाळेत लागवड केलेल्या भाजीपाल्याची काढणी करताना विद्यार्थी, शिक्षक.