जमाव बंदीचे उल्लंघन
पोलिस नसल्याने पहिल्याच दिवशी फज्जा
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १० : राज्यभरात कोविडच्या वाढत्या रुग्णांमुळे सर्वत्र पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत जमाव बंदीचे आदेश दिले आहेत. मात्र पनवेल, नवी मुंबई आणि उरण परिसरात पहिल्याच दिवशी जमाव बंदीचा फज्जा उडाला. सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त समुहाने नागरिकांनी गर्दी केली होती. शहरातील मॉल, किराणामालाचे जनरल स्टोअर, बाजारपेठा गजबजलेल्या होत्या.
नवी मुंबई आणि पनवेल महापालिका क्षेत्रात गेला आठवडाभर रोजच्या रोज कोविड रुग्णांची विक्रमी आकडेवारी नोंद होत आहे. अवघ्या २० ते २५ दिवसांत नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोविड रुग्णांचा आकडा १३ हजार रुग्णांच्या पुढे गेला आहे. पनवेल महापालिकेतही कोविड रुग्णांचा आकडा ५ हजारांच्या पुढे गेला आहे. तरी सुद्धा शहरातील सार्वजनिक जागांवर होणारी गर्दी कमी झालेली नाही.
नवी मुंबई शहरात सोमवारी जमावबंदीचा परिणाम कुठेच दिसून आला नाही. शहरातील सर्व बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणे भरलेली दिसली. दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, तुर्भे, सानपाडा, जुईनगर, नेरूळ, सीवूड्स, बेलापूर येथील परिसरातील स्थानिक बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होती. रेल्वे स्थानक परिसरही गजबजलेले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघर, कामोठे, कळंबोली, रोडपाली, तळोजा, खांदा कॉलनी, नवीन पनवेल आणि पनवेल येथील सार्वजनिक जागा नागरिकांनी भरलेल्या आहेत.
नवी मुंबई आणि पनवेल हे दोन्ही परिसर नवी मुंबई पोलिस आयुक्तालय अंतर्गत येतात. पण या दोन्ही महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर पोलिसांकडून नाका बंदी करण्यात आली नव्हती. महामार्गावरील वाहनांमध्ये पाचपेक्षा जास्त नागरिक एकत्र बसून फिरत होते. वाशीतील अंतर्गत रस्ते, नेरूळ, सीबीडी-बेलापूर येथे रस्त्यांवर गर्दी दिसून आली. सीबीडीत बहुतांश बँक आणि खासगी कंपन्यांचे कार्यालये आहेत. या कार्यालयात ये-जा करणाऱ्यांची संख्येमुळे चहा आणि खाद्यपदार्थांची टपऱ्या गजबजल्या होत्या. या ठिकाणी उभ्या राहणाऱ्या ग्राहकांकडून कोविड नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत होते.
--------------------------------------------
जमावबंदीचे आदेश लागू झाले आहेत. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये याकरिता पोलिस बंदोबस्त देण्याबाबत पोलिस आयुक्तांसोबत चर्चा करण्यात आली आहे. तसेच मॉल आणि किराणामालाच्या दुकानात गर्दी होऊ नये या करिता सूचना देण्यात येणार आहेत.
- अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका, आयुक्त
------------------------------------------------
डी-मार्ट, मॉल्समध्ये गर्दी
सार्वजनिक ठिकाणांवर गर्दी रोखण्यासाठी सरकारने जमाव बंदी लागू केली आहे. त्यानुसार रस्त्यावरील गर्दी दिसण्यात येत असल्याने नियंत्रणात आणता येणार आहे. पण शहरातील मॉल आणि डी-मार्ट सारखे किराणा मालसारखे स्टोअर्समधील गर्दी आवरणे प्रशासनासमोर आव्हान आहे. शहरात मॉल आणि जनरल स्टोअर्समध्ये गर्दी होत आहे.