कोरोना रुग्णांमुळे राज्यात
ऑक्सिजनची मागणी वाढली
रोजची मागणी ४२४ टनांवर पोचली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : कोरोना संसर्ग वेगाने पसरत असल्याने राज्यात रोजची रुग्णसंख्याही वाढत आहे. ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. परिणामी ऑक्सिजनची मागणीही वाढली आहे. सध्या राज्यात दैनंदिन ऑक्सिजनची मागणी ४२४ टनांवर पोचली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात ऑक्सिजनची मागणी २७० ते ३०० टन होती.
रविवारी मुंबईत १८,४७४ रुग्ण सापडले. त्यातील ११८ जणांना ऑक्सिजन खाटांची गरज भासली. सध्या ३०३५ रुग्ण ऑक्सिजन खाटांवर उपचार घेत आहेत. राज्यातही सक्रिय रुग्णांचा आकडा २,०२,२५९ वर पोचला आहे. दिवसेंदिवस ऑक्सिजन खाटांची गरज वाढत आहे. फेब्रुवारीमध्ये तिसरी लाट जोरात असेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. उपचाराधीन रुग्ण वाढले तर ऑक्सिजन खाटांची मागणीही वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा प्राणवायूची मागणीही वाढणार असल्याचा अंदाज आहे.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली होती. पहिल्या लाटेत दिवसाला ८५० टन इतकी ऑक्सिजनची मागणी होती. दुसऱ्या लाटेतही मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन लागला होता. कोरोना बाधितांवरील उपचारासाठी सरकारला इतर राज्यांतून ऑक्सिजन मागवावा लागला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान राज्यात ऑक्सिजन उत्पादन करणारे प्लांटही उभारण्यात आले. त्यामुळे राज्याकडे पुरेसा ऑक्सिजन साठा उपलब्ध असल्याचा दावा करण्यात येत आहे.
सध्या मुंबईसह राज्यातील नव्या बाधित रुग्णांमध्ये लक्षणे नसलेल्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. फार कमी रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. परिणामी ऑक्सिजन बेडची गरज अजून तरी नियंत्रणात आहे. मात्र, रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजनची मागणीही वाढली आहे. त्यादृष्टीने राज्यात ऑक्सिजनचे उत्पादन वाढवण्यात आले असून गरज भासल्यास तातडीने वाहतूक करण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे.
......
१२०० टन ऑक्सिजनचे प्रकल्प
कोविडची तिसरी लाट येणारच असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तिसरी लाट आलीच तर त्यासाठी ऑक्सिजनचीही गरज भासण्याची शक्यता आहे. ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी अन्न व औषध प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून राज्यभरात सहा हजार टन ऑक्सिजनची तयारी करण्यात आली आहे. शिवाय १२०० टन ऑक्सिजनचे मोठे प्रकल्प तयार करण्यात येत आहेत, असे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त परिमल सिंग यांनी सांगितले.
.......