गोरेगावत गटाराचे पाणी रस्त्यावर
भगतसिंगनगरमधील समस्या
गोरेगाव, ता. ११ (बातमीदार) ः गोरेगाव पश्चिमेकडील भगतसिंगनगर क्रमांक एकमधील कला गणेश मंदिराच्या रस्त्यावर मागील एक महिन्यापासून गटाराचे पाणी साचत आहे. त्यामुळे या परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
याबाबत स्थानिक रहिवासी वैभव सरोदे यांनी पी दक्षिण विभागाच्या अधिकाऱ्यांना ई-मेल व ट्विट केले आहे.रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे चालणे कठीण झाले आहे. या घाण पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून या परिसरातील लहान मुले, वृद्ध महिला, पुरुष यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. घाणीच्या पाण्याचा लवकर निचरा करून, नेमके कारण शोधून समस्या सोडविण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. पालिकेकडून पाहणी करून कार्यवाही सुरू झाल्याचे कळते. भगतसिंगनगर परिसरात बैठ्या चाळी व झोपडपट्टी असल्याने जलवाहिनी, मलनिस्सारण वहिनी, अंतर्गत गटारे, छोटे नाले यांची गुंतागुंत आहे. बरेचदा रहिवासी घरदुरुस्तीदरम्यान खासगी प्लंबर व कारागिरांकडून पालिका कर्मचाऱ्यांच्या सल्ल्याशिवाय कामे करून घेतात. परिणामी जलवाहिन्या आणि मलनिस्सारण वाहिन्यांसी संबंधित समस्या बरेचदा उद्भवतात, असे एका पालिका कर्मचाऱ्यांने सांगितले.
...