खैर तस्कराला पकडणाऱ्या वन मजुरालाच केले आरोपी?

खैर तस्कराला पकडणाऱ्या वन मजुरालाच केले आरोपी?

खैर तस्कराला पकडणाऱ्या वन मजुरालाच केले आरोपी? वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांवर कारवाईची ग्रामस्थांची मागणी मनोर, ता. ११ (बातमीदार) : खैर तस्कराला पकडण्यासाठी मदत करणाऱ्या वन मजुरालाच या प्रकरणात आरोपी करण्यात आल्याचा प्रकार दहिसर वनपरीक्षेत्रात घडला आहे. या प्रकारामुळे वनविभागाच्या कार्यपद्धतीविरोधात स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून, मनमानी पद्धतीने काम करणाऱ्या वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही गांजे गावातील नागरिकांकडून करण्यात आली आहे. दहिसर वनपरीक्षेत्रात खैराच्या तस्करीत मोठी वाढ झाली असून, हजारोंच्या संख्येने खैराच्या झाडांची कत्तल झाल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. दहिसर वन परीक्षेत्राअंतर्गत बांबरोटे गावच्या हद्दीत १ जानेवारीला पहाटे ४.३० च्या सुमारास वनविभागाच्या भाताणे वन परीक्षेत्राचे शिपाई पाडवी, वन मजूर सुदाम धोत्रे आणि सीताराम कोळेकर रात्रगस्तीवर होते. खैर तस्करांनी गस्तीवरील कर्मचाऱ्यांच्या अंगावर टेम्पो घालून रस्त्यावर अडथळ्यासाठी रचलेल्या दगडांच्या ढिगावरून टेम्पो पळवून नेला होता. जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या कालव्यात उड्या मारल्या होत्या. त्यानंतर गस्ती पथकाच्या वाहनाने टेम्पोचा पाठलाग सुरू केला होता. दगडावरून टेम्पो उडवून नेल्याने टेम्पोच्या इंजिनमधून ऑइल पडण्यास सुरुवात झाली. या ऑइलचा माग काढत वनविभागाचे कर्मचारी हालोली गावच्या हद्दीत बनास हॉटेलच्या पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या टेम्पोजवळ पोहोचले. या वेळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना पाहून टेम्पोचालकाने तेथून पळ काढला. परंतु वनमजूर धोत्रे याने चालकाचा पाठलाग करून त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. या वेळी ३१ खैराच्या ओंडक्यांसह टेम्पो जप्त करून चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासात टेम्पोचालकाने दिलेल्या माहितीनुसार खैर तस्करीमध्ये सहभागी असणाऱ्या विश्राम ऊर्फ देवा धोडी, सुधीर पऱ्हाड, राजेश मिरका आणि दशरथ पऱ्हाड या चार आरोपींना ताब्यात घेतले होते. न्यायालयाकडून आरोपींना जमीन मंजूर करण्यात आला आहे. खैर तस्करी प्रकरणातील संशयित सूरज कोळेकर आणि मनोज जाधव फरार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे, परंतु या कारवाईत टेम्पोचालकाला पकडणाऱ्या वनमजुरालाच आरोपी केल्याने ग्रामस्थांकडून वनविभागाच्या कार्यपद्धतीविरोधात संताप व्यक्त करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या टेम्पोचालकाने दिलेल्या माहितीनुसार खैर तस्करीत सहभाग असलेल्या चार आरोपींना अटक करण्यात आली होती. अटक आरोपींकडून मिळालेल्या माहिती आणि मोबाईल कॉल रेकॉर्डवरून वनमजूर सुदाम धोत्रे याचा सहभाग निष्पन्न झाला आहे. खैर कत्तल आणि तस्करीमध्ये सुमारे ५० ते ६० जणांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. - नम्रता हिरे, वन परीक्षेत्र अधिकारी, दहिसर जीवाला धोका असताना खैर तस्कराला पकडले, परंतु या तस्करी प्रकरणात आरोपी करण्यात आल्याने मला आश्चर्याचा धक्का बसला आहे. - सुदाम धोत्रे, वनमजूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com