मालमत्ता कर भरा; अन्यथा लिलाव
वसई-विरार महापालिकेचा इशारा
वसई, ता. ११ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेने आर्थिक तिजोरी मजबूत करण्यासाठी मालमत्ता कर संकलन करण्यासाठी कंबर कसली आहे. कराची थकबाकी वसूल करण्यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती करतानाच कर भरला नाही तर लिलाव मोहीमदेखील सुरू केली जाणार असल्याचा इशारादेखील देण्यात येत आहे.
वसई-विरार महापालिकेने गेल्या वर्षापेक्षा यंदा विक्रमी वसुलीचा पल्ला गाठला आहे. जानेवारी महिन्यापर्यंत एकूण २३६ कोटी वसूल केले आहेत. २०२१ या आर्थिक वर्षापेक्षा १५ कोटी अधिक जमा झाले आहेत; तर जानेवारी ते मार्चपर्यंत एकूण ४०० कोटीचे लक्ष्य महापालिकेच्या मालमत्ता कर संकलन विभागाने ठेवले आहे. पालिका हद्दीत आठ लाखांहून अधिक मालमत्ताधारक असून, १०० टक्के देयके देण्यात आली आहेत. स्मरणपत्र देऊन करभरणा करण्याच्या सूचना केल्या जात आहेत. त्याचबरोबर औद्योगिक वसाहत व नागरी वस्तीत महापालिकेने पथके तयार केली असून, वाहनांच्या माध्यमातून घरोघरी उद्घोषणा करून मालमत्ता कर भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
थकबाकीधारकांनी कर भरला नाही, तर त्यांची नळजोडणी खंडित केली जाणार आहे. आतापर्यंत अनेक मालमत्तादेखील सील करण्यात आल्या आहेत. त्यातील अनेकजण कर भरण्यास पुढे येत आहेत व उर्वरित जणांना मालमत्ता लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यासाठी इशारा देण्यात आला आहे.
कोट
वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या मालमत्ताधारकांनी कर भरणा करावा म्हणून जागृती सुरू आहे. रोजचा आढावा घेतला जात असून मालमत्ता सील करण्यात येत आहेत. त्याचबरोबर टप्प्याटप्प्याने कर भरण्याची सुविधादेखील उपलब्ध आहे. कर न भरणाऱ्यांवर कारवाई सुरू केली जाणार आहे.
प्रदीप जांभळे पाटील,
उपायुक्त, मालमत्ता कर संकलन विभाग
वसई : पालिका हद्दीत मालमत्ता कर संकलनासाठी उद्घोषणा देत वाहन फिरत आहे.