कोरोना निर्बंधांमुळे पतंग व्यवसायात `ढिल`

कोरोना निर्बंधांमुळे पतंग व्यवसायात `ढिल`

कोरोना निर्बंधांमुळे पतंग व्यवसायाला `ढिल` विक्रेत्यांवर संक्रांत, विक्रीवर ९० टक्के परिणाम ठाणे, ता. ११ (बातमीदार) : नववर्षाच्या सुरुवातीलाच येणाऱ्या मकरसंक्रांती सणाला अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. काही वर्षांपूर्वी संक्रांतीचा सण जवळ येताच, आकाश रंगीबेरंगी आणि विविध आकाराच्या पतंगांनी सजलेले असायचे, परंतु कोरोना काळातील निर्बंधांचा फटका यंदा या सणाला बसल्याने मकर संक्रांत साजरी करण्यासाठी सर्वत्रच उदासीनता पाहायला मिळत आहे. निर्बंधांमुळे पतंगांच्या मागणीत मोठी घट झाली असून, यंदा पतंग व्यवसायावर ९० टक्के परिणाम झाला आहे. ठाण्यातील बाजारेठेत मकर संक्रतीनिमित्त गुजरात येथून मोठ्या प्रमाणावर पतंगांची आवक होते. सणाच्या मोसमातही पतंगांच्या खरेदीसाठी मागणीच नसल्याने ठाण्यातील मुख्य बाजारपेठेत हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या दुकानांत पतंग विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. शाळा-महाविद्यालये बंद असल्याने लहान मुले आणि युवकांकडून येणाऱ्या पतंगांच्या मागणीत यंदा मोठी घट झाली आहे. सध्या पतंग खरेदी करणारे ग्राहक सजावटीसाठी काही लहान-मोठ्या आकाराच्या पतंगांची खरेदी करीत असून सणाच्या तोंडावर आतापर्यंत केवळ १० टक्केच पतंगांची विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. ठाण्यातील बाजारपेठेत ५ ते १०० रुपयांपर्यंतच्या पतंग विक्रीसाठी उपलब्ध आहेत; तर धाग्याच्या मांजाचे रोल सध्या प्रतिबंडल ३० ते ४०० रुपयांपर्यंत आहेत. कोरोनापूर्वी पतंगबाजीची क्रेझ असल्याने ५० हून अधिक प्रकारचे पतंग दुकानात उपलब्ध असायचे; मात्र दोन वर्षे मागणीच नसल्याने यंदा केवळ १० प्रकारचे पतंग विक्रीसाठी आले आहेत. कोरोना साथीमुळे २०२१ मध्ये केवळ ४० टक्के पतंग आणि मांजाची विक्री झाली होती आणि ६० टक्के व्यवसायावर परिणाम झाला होता, परंतु सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या तडाख्यामुळे यंदा ९० टक्के व्यवसायावर परिणाम झाला असून, केवळ १० टक्के मालाची विक्री झाल्याचे ठाण्यातील पतंग विक्रेत्यांनी सांगितले. --- लहान मुले, युवावर्गाचा मकर संक्रतीनिमित्त पतंग उडवण्याकडे ओढा असतो; मात्र यंदा शाळा-महाविद्यालये बंद असून, कोरोनामुळे दिवसा जमावबंदीदेखील लागल्याने ग्राहकांनी पतंग खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे आतापर्यंत केवळ १० टक्केच मालाची विक्री झाली असून, या वर्षीही नुकसान सहन करावे लागणार आहे. - हासीम मेमन, घाऊक विक्रेते सध्या कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याने काळजी घेऊन मुलांना घराबाहेर पाठवत नाहीत. यंदा मकर संक्रांतीचा सणदेखील घरगुती पद्धतीने साजरा करणार असून पतंगांची खरेदी केलेली नाही. - सुरेखा परब, गृहिणी, ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com