तळा येथे रंगणार १४ उमेदवारांच्या लढती
शेवटच्या दिवशी चार उमेदवारी अर्ज मार्ग; चुरस वाढणार
तळा, ता. १२ (बातमीदार) : तळा नगरपंचायतीच्या चार प्रभागांत चार जागांसाठी निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने चुरस वाढली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात १४ उमेदवारांची लढत रंगणार आहे.
त्यात प्रभाग १ मध्ये दुरंगी, प्रभाग ३ मध्ये तिरंगी, प्रभाग १० मध्ये चौरंगी, प्रभाग १४ पंचरंगी अशा लढती होणार आहेत.
तळा नगरपंचायत निवडणूक २१ डिसेंबरला पार पडली. त्या वेळी एका जागेवर शिवसेनापुरस्कृत अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने १२ जागेवर ३५ उमेदवारांमध्ये निवडणूक पार पडली होती. ओबीसी आरक्षणामुळे चार जागेवर स्थगिती आली. ती निवडणूक १८ जानेवारीला पार पडणार आहे. निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत (ता. १०) चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत निवडणूक रिंगणात १४ उमेदवार उभे आहेत. चार प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक १ मध्ये राष्ट्रवादी व शिवसेना अशी दुरंगी लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक ३ मध्ये शेकाप, शिवसेना व राष्ट्रवादी अशी तिरंगी, तर प्रभाग क्रमांक १० मध्ये शिवसेना, भाजप, शेकाप व राष्ट्रवादी अशी चौरंगी लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक १४ मध्ये राष्ट्रवादी, शिवसेना व तीन अपक्ष अशी पंचरंगी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या चार प्रभागांत होणाऱ्या निवडणुकीवर आता सगळ्यांचे लक्ष लागले असून, सर्वच पक्षांना ताकद लावावी लागणार आहे.