पालिकेच्या तिजोरीत २१० कोटींचा भरणा
कोरोना काळातील खणखणाटानंतर आर्थिक स्थितीत सुधारणा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ ः कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा परिणाम सर्व क्षेत्रांसह ठाणे महापलिकेच्या तिजोरीवरदेखील झाल्याचे दिसून आले. या कालावधीत ठेकेदारांनी केलेल्या कामांची बिले अदा करण्यासाठीदेखील पालिकेकडे निधी उपलब्ध नव्हता. अशातच मागील काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर त्याचा सकारात्मक परिणाम पालिकेच्या आर्थिक स्थितीवर झाल्याचे दिसून येत आहे. नव्या वर्षात पालिकेच्या तिजोरीत उत्पन्न आणि खर्चाची सांगड घातल्यानंतर २१० कोटींची शिल्लक असल्याची सकारात्मक बाब समोर आली आहे.
मागील दोन वर्षांपासून थैमान घालणाऱ्या कोरोनाचा फटका पालिकेलादेखील बसला. त्यात दोन महिन्यांपूर्वी पालिकेच्या तिजोरीत अवघे १५ कोटी शिल्लक असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे पालिकेचा गाडा कसा हाकला जाणार, असा प्रश्नदेखील उपस्थित करण्यात येत होता. त्याचा परिणाम शहरातील विविध विकास कामांवरदेखील होऊ लागला होता. अशातच कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्यानंतर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. पालिकेच्या तिजोरीतदेखील सुधारणा झाल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे.
जानेवारी महिन्यात पालिकेच्या तिजोरीत उत्पन्न आणि खर्चाची सांगड घातल्यानंतर आजही २१० कोटींची शिल्लक असल्याची सकारात्मक बाब समोर आली आहे. यंदाचे आर्थिक वर्ष पूर्ण होण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. त्यात एकूण उद्दिष्टाच्या केवळ ३५४ कोटींची वसुली पालिकेला करावी लागणार आहे. विविध स्रोतांकडून येणाऱ्या उत्पन्नाच्या आधारावर यंदा दोन हजार ७५४ कोटींचे उत्पन्न पालिकेला मिळेल अशी आशा होती. त्यानुसार डिसेंबरअखेर दोन हजार ४०० कोटींची समाधानकारक वसुली झाली आहे.
---
अशी झाली वसुली
मालमत्ता कर विभागाचे ७४० कोटींच्या वसुलीचे लक्ष्य आहे. या विभागाची ४६६ कोटींची वसुली आतापर्यंत झाली आहे; तर अग्निशमन विभागाकडूनदेखील ७३ कोटींची वसुली झाली आहे. शहर विकास विभागाला ३४२ कोटींचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यानुसार या विभागाने आतापर्यंत ७७० कोटींचे लक्ष्य पार केले आहे. त्यामुळे या विभागाने यंदा लक्ष्यांकाच्या दुप्पट वसुली केल्याचे दिसून आले. दुसरीकडे मीटर पद्धतीचा फटका पाणीपट्टीच्या वसुलीवर झाल्याचे दिसून येत आहे. पाणीपुरवठा विभागाला २०८ कोटींचे लक्ष्य असताना या विभागाची आतापर्यंत ५४ कोटींचीच वसुली करण्यात आली आहे.