खानिवडे रेतीबंदरावर धडक कारवाई
११ बोटी, १० सक्शन पंप निकामी
नालासोपारा, ता. ११ (बातमीदार) : वसई तालुक्यात अवैधपणे रेती उपसा चालू आहे. वसई तहसीलदार उज्ज्वला भगत यांनी खानिवडे रेती बंदर येथे सोमवारी (ता. १०) धडक कारवाई करत ११ बोटी साखरमिश्रित पाण्याने नष्ट; तर १० सक्शन पंप निकामी केले आहेत.
वसई तालुक्यातील रेती बंदरावर रेती उपसा करून, वाहतूक करण्यावर न्यायालयाचे निर्बंध आहेत, पण या निर्बंधांना झुगारून रेती माफिया अनाधिकृत रेती उत्खनन करत आहेत. विरार हद्दीत खानिवडे, नारंगी, काशीद-कोपर, चांदीप, उसगाव, शिरगाव, वैतरणा यासह अन्य ठिकाणी रेती बंदर आहेत. वर्षानुवर्षे संक्शन पंपाने या बंदरावर रेतीउपसा केल्यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. सर्व रेतीबंदर बंद असतानाही खानिवडे रेतीबंदरावर चोरून बोट आणि सक्शन पंपाच्या साह्याने रेतीउपसा सुरूच असल्याची माहिती वसईच्या तहसीलदार उज्ज्वला भगत यांना मिळाली होती. महसूलचे नायब तहसीलदार, तलाठी, मंडळाधिकारी, पोलिस यांचे विशेष पथक तयार करून, सोमवारी खानिवडे रेती बंदरावर छापा टाकला. अधिकाऱ्यांना पाहताच तेथील रेतीमाफिया फरार झाले. बंदरावर मिळालेल्या ११ बोटी आणि १० संक्शन पंपांच्या इंजिनमध्ये साखरमिश्रित पाणी टाकून ते निकामी करत उध्वस्त केले आहेत.
नालासोपारा : खानिवडे रेती बंदरावर अवैध रेतीउपशावर कारवाई करण्यात आली. (छायाचित्र : विजय गायकवाड)