एसआरए सदनिका हस्तांतरण शुल्क रद्द करा!
केवळ एक हजार रुपये घेण्याची घोसाळकर यांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत पुनर्वसन करण्यात आलेल्या इमारतींमधील सदनिकांचे हस्तांतरण करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) मार्फत दीड लाख रुपये घेण्यात येतात. या शुल्कामुळे सर्वसामान्य घर खरेदीदारांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे या योजनेतील घरांची खरेदी विक्री झाल्यानंतर त्यांचे हस्तांतरण करण्यासाठी केवळ एक हजार रुपये शुल्क आकारावे, अशी मागणी शिवसेना नेते विनोद घोसाळकर यांनी केली आहे.
मुंबईत झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत शहर आणि उपनगरात अनेक झोपड्यांचा पुनर्विकास झाला आहे. पुनर्वसन झालेल्या इमारतींमधील घरांची दहा वर्षे खरेदी विक्री करता येत नाही. या नियमानंतरही अनेकांनी घरांची खरेदी विक्री केली आहे. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे या प्रकरणांमध्ये कारवाई सुरु आहे; मात्र एसआरएची घरे दहा वर्षानंतर खरेदी करणाऱ्या नागरिकांना एसआरएमध्ये घराचे हस्तांतरण करण्यासाठी मुद्रांक शुल्क रक्कम सुमारे दीड लाख भरावी लागते, तसेच एसआरए प्रशासन सदनिका हस्तांतरण करण्यासाठी दीड लाख रुपये शुल्क घेते. त्यामुळे एसआरएच्या इमारतीमध्ये घर घेणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना विविध शुल्क भरण्यासाठी सुमारे तीन लाख रुपयांचा आर्थिक भार सहन करावा लागत आहे.
----
एसआरएच्या पुनर्वसन इमारतीमध्ये घर घेणाऱ्या नागरिकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना ही रक्कम भरण्यासाठी कर्ज काढण्याची वेळ येते. त्यामुळे या नागरिकांना दिलासा देण्यासाठी एसआरए प्राधिकरणाने सदनिका हस्तांतरण शुल्क एक हजार रुपये करावे असा प्रस्ताव गृहनिर्माण विभागाकडे पाठवला आहे.
- विनोद घोसाळकर, शिवसेना नेते.