बांधकाम प्रकल्पाची प्रगतीची माहिती ऑनलाईन
विकासकांकडून होणाऱ्या फसवणुकीला बसणार चाप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : बांधकाम प्रकल्प पूर्ण झाल्याबाबत इंजिनिअर,आर्किटेक्टकडून बनावट प्रमाणपत्र सादर करून अनेक विकासक ग्राहकांची दिशाभूल करतात. ग्राहकांच्या फसवणुकीला चाप लावण्यासाठी महारेराने विकासकांनी सादर केलेली प्रमाणपत्र आता महारेराच्या संकेतस्थळावर जाहीर करण्याचा निर्णय महारेराने घेतला आहे. यामुळे विकासकांकडून होत असलेल्या बनवाबनवीला चाप बसणार आहे.
राज्यातील बांधकाम प्रकल्पाची नोंदणी विकासकांना महारेराकडे करावी लागते. त्यानुसार प्रकल्प कधी पूर्ण होणार आणि त्याची सद्यस्थितीची माहिती विकासकाला संकेतस्थळावर अपलोड करावी लागते. प्रकल्पाचे काम जसजसे पूर्ण होईल, त्या टप्प्यानुसार विकासक घर खरेदीदार ग्राहकाकडून पैसे घेतात; मात्र काही विकासक बांधकाम अपूर्ण असतानाही इंजिनिअर, आर्किटेक्ट यांची खोटी प्रमाणपत्र सादर करून कामांचे टप्पे पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दर्शवत ग्राहकांकडून पैसे घेतात. हे प्रकार रोखण्यासाठी प्रकल्पांच्या प्रगतीबाबत विकासकांनी सादर केलेल्या मुख्य अर्जाची माहिती सार्वजनिक डोमेनमध्ये ठेवण्याचा निर्णय महारेराने घेतला आहे.
---
महारेराकडे दाद मागता येणार
विकासकांनी प्रकल्पांच्या प्रगतीशी संबंधित सादर केलेले अर्ज क्रमांक १, २, ३, ५ आणि २अ ची माहिती सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे घर खरेदी केलेल्या ग्राहकांना बांधकामाच्या ठिकाणी जाऊन कामाची सद्यस्थिती पाहता येणार आहे. विकासकाने फसवणूक केली असल्यास याबाबत ग्राहकांना महारेराकडे दाद मागता येणार आहे.