विक्रमगडमधील नामंकित शाळेत कोरोनाचा उद्रेक
४६ विद्यार्थी व ८ कर्मचारी पॉझिटिव्ह, तालुक्यात खळबळ
अमोल सांबरे
विक्रमगड, ता. ११ (बातमीदार) ः विक्रमगड तालुक्यातील एका नामांकित शाळेत करोनाचा उद्रेक झाला आहे. या शाळेतील ४६ विद्यार्थी आणि आठ कर्मचारी अशा एकूण ५४ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप निंबाळकर यांनी दिली. त्यामुळे शाळा व्यवस्थापन आणि तालुक्याचे आरोग्य प्रशासन हादरले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असून काही विद्यार्थ्यांना सौम्य लक्षणे आहेत; तर काही विद्यार्थ्यांना कोणतीही लक्षणे नाहीत.
पॉझिटिव्ह आलेल्या ४६ विद्यार्थ्यांपैकी सहा विद्यार्थिनी आहेत. हे सर्व विद्यार्थी ७ वी, ९ वी, १० वीच्या वर्गातील आहेत. यांच्यासह आठ शालेय कर्मचारी पॉझिटिव्ह असून या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांची वैद्यकीय टीम देखरेखीसाठी तैनात करण्यात आली आहे. या सर्वांवर उपचार सुरू असून त्यांच्यावर २४ तास ही वैद्यकीय टीम लक्ष ठेवून असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी अशा एकूण २३२ जणांची अँटिजेन चाचणी करण्यात आली होती.
-------
प्रतिक्रिया
या विद्यार्थ्यांची अँटिजेन चाचणी पॉझिटिव्ह आली असून विद्यार्थ्यांना कुठलीही लक्षणे नाहीत. त्यामुळे घाबरण्याचे कारण नसून तालुका आरोग्य विभागाच्या डॉक्टरांची या ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या सर्वांची प्रशासन काळजी घेत असून पालकांनी किंवा नागरिकांनी घाबरून जाऊ नये. नागरिकांनी सतर्क राहून कोरोना नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.
- चारुशीला पवार
(तहसीलदार, विक्रमगड)