पेठपाडा स्थानकाजवळील कचरा हटवा
नवी मुंबई मेट्रो सुरू होण्यापूर्वी डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याची मागणी
खारघर, ता. ११ (बातमीदार) : पेठपाडा मेट्रो स्थानकाशेजारी पनवेल पालिकेकडून टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे तेथे काम करणारे कामगार आणि सुरक्षा रक्षक दुर्गंधीने त्रस्त झाले आहेत. हा डम्पिंग ग्राऊंड नवी मुंबई मेट्रो सुरू होण्यापूर्वी पालिकेने हटवावा, अशी मागणी सेक्टर ३४ मधील नागरिक आणि स्थानकांवरील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.
घर आणि सोसायटीतील ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करून त्यापासून सेंद्रिय खताची निर्मिती करा, कचरा पेटीतच टाका, अशा प्रकारचे नागरिकांना मार्गदर्शन करणाऱ्या पनवेल पालिकेकडूनच खारघरमधील नवी मुंबई मेट्रो मार्गावरील पेठपाडा स्थानकाशेजारील सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर अनधिकृतपणे डम्पिंग ग्राऊंड उभारण्यात आले आहे. या कचऱ्यातून पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे खारघर सेक्टर ३४ मधील नागरिक, तसेच पेठपाडा स्थानकावर काम करणारे सिडकोचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक, स्थानकाशेजारील एनएमएमआयएस आणि रामशेठ ठाकूर महाविद्यालयातील कर्मचारी त्रस्त आहे.
खारघर वसाहतीमधील घनकचरा पनवेल पालिकेडून उचलला जातो. हा कचरा घंटागाडीद्वारे तळोजा घोट येथील डम्पिंग ग्राऊंडमध्ये घेऊन जाणे आवश्यक असताना घंटागाडीवरील कामगार ओवेपेठ मेट्रोशेजारील तो सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर टाकत असतात. परिणामी, मैदानाला डम्पिंगचे स्वरूप आले आहे. कचऱ्यातून पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
मेट्रो सुरू झाल्यानंतर प्रवाशांना या डम्पिंग ग्राउंडचे दर्शन होणार असल्याने ती सुरू होण्यापूर्वीच पालिकेने कचरा हटवावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. याविषयी खारघरच्या सिडको कार्यालयात विचारणा केली असता, सिडकोकडून खारघरमधील कचरा उचलून थेट घोट येथील डम्पिंग ठिकाणी घेऊन जातो. पालिकेने सिडकोच्या कॉर्पोरेट पार्कच्या भूखंडावर दैनंदिन कचरा टाकल्यानंतर तो उचलून घोट येथे घेऊन जावा. सिडकोकडून ज्या पद्धतीने घनकचरा उचलला जाते असे. त्या पद्धतीने पालिकेने कचरा उचलून परिसरात दुर्गंधी होणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे आहे, असे सांगितले.
--------------------------------
ओवेपेठ मेट्रो स्थानकाशेजारी दैनंदिन कचरा टाकला जात असल्यामुळे परिसरात मोकाट कुत्र्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच कचऱ्यामुळे पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे सेक्टर ३० आणि ३४ मधील नागरिक त्रस्त आहेत. पालिकेने हा डम्पिंग ग्राऊंड हटवावा.
- विभूती बर्वे, रहिवासी, सेक्टर ३४, खारघर
--------------------------------
पेठपाडा स्थानकाशेजारी टाकण्यात येणारा कचरा नियमितपणे उचलला जाईल, याची काळजी घेतली जाईल. परिसरातील कचरा एकत्र करण्यासाठी जागेची आवश्यकता आहे. या संदर्भात सिडकोने भूखंड उपलब्ध करून द्यावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
- डॉ. वैभव विधाते, आरोग्य विभाग, पनवेल महानगरपालिका