मुंबईतील रुग्णसंख्येत दिलासादायक घट

मुंबईतील रुग्णसंख्येत दिलासादायक घट

मुंबईची रुग्णसंख्या निम्म्यावर पॉझिटिव्हिटी दर २० टक्क्यांपर्यंत घसरला सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ११ : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात होती. प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले होते; मात्र गेल्या चार दिवसांत मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या २०,७०० वरून ११,६४७ पर्यंत खाली आल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दोन दिवसांत मुंबईचा पॉझिटिव्हिटी दर ३० वरून २० टक्क्यांवर आला आहे. रुग्णालयांत दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांचा आलेखही कमी झाला आहे. परिणामी, मुंबईतील तिसरी लाट नियंत्रणात आणण्यात यश आले असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केले आहे. मुंबईत २१ डिसेंबर २०२१ रोजी कोरोना संसर्गाची तिसरी लाट सुरू झाली. त्यानंतर बाधित रुग्णांचा आलेख वाढत गेला; मात्र चार दिवसांपासून नवीन रुग्णांचा आकडा कमी होऊ लागला आहे. मंगळवारी (ता. ११) एका दिवसांत रुग्णालयातील ८५१ खाटा व्यापल्या गेल्या. दुसरीकडे ९६६ खाटा रिकाम्या झाल्या. त्यामुळे रुग्णालयातील एकूण ८० टक्के खाटा रिक्त आहेत. मृत्युदर नियंत्रणात तिसऱ्या लाटेत रुग्ण वाढत असले, तरी मृत्युदर नियंत्रणात आहे. २२ दिवसांत ४६ मृत्यू झाले. दररोज सरासरी केवळ दोन मृत्यू झाले आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेत दैनंदिन रुग्णसंख्या २५० वरून २० हजारावर गेली तरी मृत्युदर मात्र नियंत्रणातच आहे. दैनंदिन मृत्यू पाचच्या आत ठेवण्यात प्रशासनाला यश आले आहे. आज ११,६४७ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यांपैकी ७६ रुग्णांना ऑक्सिजन बेडवर दाखल करण्यात आले आहे. सतत चौथ्या दिवशी बाधितांची संख्या कमी झाली आहे. त्याआधी सोमवारी १३,६४८ आणि रविवारी १९,४७४ नवीन रुग्णांची भर पडली होती. आज नोंद झालेल्या ११,६४७ रुग्णांपैकी ९,६६७ (८३ टक्के) रुग्ण लक्षणेविरहित आहेत. नवीन रुग्णांपैकी ८५१ रुग्णांना (६.३६ टक्के) रुग्णालयात दाखल करण्यात आले. आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी ७,२८३ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर वाढून ८७ टक्क्यांपर्यंत आला आहे. कोरोना रुग्णवाढीचा दर १.८७ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा दरही ३६ दिवसांपर्यंत खाली आला आहे. मुंबईत दैनंदिन बाधितांची संख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडाही आज १,०३,८६२ वरून १,००,५२३ पर्यंत काहीसा कमी झाला आहे. मुंबईत रुग्ण दगावण्याचे प्रमाणही नियंत्रणात आहे. आज दोन रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण मृतांचा आकडा १६,४१३ वर पोचला आहे. आज ६२,०९७ चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत १,४३,२५,१४४ चाचण्या करण्यात आल्या. आज १४,९८० रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ८,२०,३१३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत २७९५ रुग्णांना ऑक्सिजन बेडवर उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुंबईत आतापर्यंत ९,३९,८६७ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील ६,४२,७४५ (६७.९८ टक्के) रुग्ण लक्षणेविरहित आहेत. एकूण उपलब्ध रुग्णशय्यांपैकी १९.९ टक्के भरल्या आहेत. ... कोट सध्या कोरोना स्थिती नियंत्रणात आहे. घाबरण्याचे कारण नाही, पण सावधगिरी बाळगण्याची नितांत गरज आहे. मास्क वापरा आणि कोविड नियमांचे काटेकोर पालन करा. - इक्बालसिंह चहल, आयुक्त, मुंबई महापालिका ..... कंटेन्टमेंट झोन शून्य मुंबईतील रुग्णसंख्या नियंत्रणात येत आहे. झोपडपट्टी आणि चाळीतील रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. सक्रिय कंटेन्टमेंट झोनची संख्याही ३० वरून थेट शून्यावर आली आहे. सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या १६८ वरून ६३ पर्यंत खाली आली आहे. ....... रुग्णांचा घसरता आलेख जानेवारी रुग्णसंख्या ११ ११,६४७ १० १३,६४८ ९ १९,४७४ ८ २०,३१८ ७ २०,९७१ ...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com