‘मानव कल्याण’कडून अन्नदान
हॉटेलमधील उरलेले जेवण भुकेल्यांच्या पोटी
नीलेश मोरे
घाटकोपर, ता. १२ ः कोरोनाचा संसर्ग तिसऱ्यांदा फैलावत आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने शासनाने कडक निर्बंध लावले आहेत. हातावर पोट भरणारे वा रस्त्यावर, फुटपाथवर आयुष्य रेटणाऱ्यांसाठी लॉकडाऊनच असल्याचे चित्र पुन्हा पाहायला मिळत आहे. त्यामुळे मानव कल्याण सेवा संघाने हॉटेलमधील उरलेले जेवण या भुकेल्यांच्या पोटी घालण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
घाटकोपर येथील मानव कल्याण सेवा संघाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतही आपली माणुसकीची सेवा अविरत ठेवली आहे. या सेवेत शाळा बंद असलेले विद्यार्थी स्वेच्छेने हातभार लावताना दिसत आहेत. पहिल्या व दुसऱ्या लाटेतही मानव कल्याण सेवा संघाकडून रस्त्यावर, फुटपाथवर वा हातावर पोट भरणाऱ्यांसाठी अन्नदानाची सेवा सुरू ठेवली होती. घाटकोपर पश्चिमेकडील झोपडपट्टी भाग मोठ्या प्रमाणात आहे. येथील बहुसंख्य वर्ग हा गरीब आहे. गोळीबार रोड येथील राशीवाला चाळीत भटक्या समाजातील लोक राहतात. या समाजाचा व्यवसाय हा पूर्णता रशीवर अवलंबून असतो. दहीहंडी काळात रशीला मोठी मागणी असते. अन्यथा वर्षभर हा समाज मिळेल ती वस्तू घरोघरी जाऊन विकून किंवा कानातील मळ साफ करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो.
...
पहिल्या-दुसऱ्या लाटेत...
कोरोना काळात या समाजावर मोठे संकट ओढवले होते. आर्थिक बाजू तर ढासळली होतीच, मात्र दोन वेळच्या जेवणाचीदेखील भ्रांत निर्माण झाली होती. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत मानव कल्याण सेवा संघाच्या अन्नदानाचा या समाजाला मोठा आधार मिळाला होता.
...
कोरोना काळात भुकेल्यांसाठी अन्नदान करण्यावर मोठा भर दिला होता. तेव्हा अनेकांचे मोठे हाल झाले होते. त्या वेळी हॉटेल लाईनमध्ये केवळ पार्सल सेवा असल्याने आम्ही हॉटेल मालकांशी बोललो. त्यांचे चांगले, पण उरलेले जेवण आम्हाला देण्याची विनंती केली. आम्ही संस्थेचे कार्य दाखवले तेव्हा अनेक हॉटेलांनी आम्हाला मदत केली. तिसऱ्या लाटेत आम्ही हॉटेलशी संपर्क करून उरलेले जेवण भुकेल्यांना सुरू केले आहे. रोज दुपारी आणि संध्याकाळी आम्ही जेवण वितरित करतो. या सेवेत परिसरातील मुलेदेखील वाढण्यासाठी हातभार लावतात.
- अनिल राठोड, अध्यक्ष, मानव कल्याण सेवा संघ.
...
सध्या शाळा पुन्हा बंद आहेत आणि घराशेजारीच संस्था आहे. घरात बसून कंटाळाला येतो. त्यामुळे आम्ही या संस्थेच्या मदतीला जातो. तेवढाच आनंद मिळतो.
- साक्षी गुप्ता, विद्यार्थिनी.
...