किहीम येथे साकारणार डॉ. सलीम अली पक्षी अभ्यास केंद्र
पर्यावरण जागृतीचे माध्यम ठरणार; पर्यटकांनाही पर्वणी
अलिबाग, ता. १२ (बातमीदार) : पर्यटन वाढीला चालना देणे, वेगवेगळ्या पक्ष्यांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी किहीम येथील जिल्हा परिषद शाळेत पक्षी शास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांच्या नावाचे अभ्यास आणि पर्यावरण शिक्षण केंद्र सुरू करण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन बुधवारी करण्यात आले. या प्रकल्पावर एक कोटी ७५ लाखांचा खर्च करण्यात येणार आहे.
डॉ. सलीम अली हे देशातील आद्य पक्षी शास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी होते. त्यांनी भारतातील पक्ष्यांचा आढळ, त्यांच्या सवयी, जाती आणि जातीमधील वैविध्यांचा बारकाईने अभ्यास केला. त्यांच्यामुळे भारतात हौशी पक्षी निरीक्षकांची परंपरा सुरू झाली. त्यांनी अलिबाग तालुक्यातील किहीम या ठिकाणी सुगरण पक्ष्याच्या वर्तनावर बारकाईने अभ्यास केला होता. त्यावर त्यांनी बीएनएचएसच्या जर्नलमध्ये प्रदीर्घ शोध निबंध लिहिला होता. हा निबंध त्यांना पक्षी शास्त्रज्ञ म्हणून नावलौकिक मिळवून देण्यास कारण ठरला. त्यामुळेच किहीम येथे हे अभ्यास केंद्र सुरू होत आहे.
.....
किहीम गावातील जिल्हा परिषदेची शाळा २००७ पासून बंद आहे. या शाळेच्या दोन इमारती असून सात वर्ग खोल्या आहेत. त्यापैकी तीन वर्ग खोल्या सुस्थितीत आहेत. या ठिकाणी हा प्रकल्प सुरू केला जाणार आहे. केंद्रामुळे पक्ष्यांचा अभ्यास विद्यार्थ्यांसह अन्य नागरिकांना करता येणार असून पर्यटन क्षेत्र म्हणून एक वेगळी ओळख या सेंटरच्या माध्यमातून होणार आहे. पक्ष्यांविषयी लिहिलेल्या वेगवेगळ्या पुस्तकांचे ग्रंथालय हे येथील वैशिष्ट्य ठरेल. देशातील वेगवेगळ्या जातीच्या तसेच कोकणातील वेगवेगळ्या पक्ष्यांची माहिती पर्यटक व स्थानिकांना मिळावी, यासाठी डिजिटल माहिती केंद्र उभारले जाणार आहे.
...
डॉ. सलीम अली यांची आठवण कायम राहण्यासाठी केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. यातून पर्यटन वाढीला चालना मिळेल. शालेय मुलांना सहलीसाठी हे केंद्र उपयोगी ठरणार आहे. जिल्हा नियोजन मधून ५५ लाख व प्रादेशिक पर्यटनातून एक कोटी २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला जात आहे.
- आदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड.