खारघरमध्ये केंद्र सरकारचे होमिओपॅथी रुग्णालय सुरू
अनेक वर्षांनंतर नागरिकांच्या सेवेत; सर्व आजारांवर उपचार होणार
खारघर, ता. १२ (बातमीदार) : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने खारघर सेक्टर १८ मध्ये खारघर मध्ये उभारण्यात आलेला केंद्रीय होमिओपॅथी रुग्णालय झाल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने खारघर सेक्टर १८ मध्ये प्लॉट नं. ३८, ३९ या भूखंडांवर ६३ हजार १७० स्क्वेअर फूट जागेत १७ कोटी रुपये खर्च करून सेन्ट्रल कौन्सिल फोर होमिओपॅथी रुग्णालयाचे भूमिपूजन २०१५ मध्ये आयुष विभागाचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते झाले होते. रुग्णालयाचे काम दोन वर्षांत पूर्ण करून नागरिकांसाठी ते खुले केले जाईल, असे आयुष विभागाकडून सांगण्यात आले होते. काम पूर्ण झाल्यानंतर याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. याविषयी हे रुग्णालय धूळ खात पडून असल्याचे वृत्त ''सकाळ''मध्ये २१ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रसिद्ध झाले होते. तसेच, खारघरमधील मनसेचे उपाध्यक्ष गणेश बनकर यांनी पालिका, सिडको आणि आयुष मंत्रालयाकडे पत्रव्यवहार केला होता. अखेर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने डिसेंबरअखेरीस रुग्णालय सुरू झाल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. रुग्णालयाची वेळ सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ अशी आहे. तर केसपेपर नोंदणी शुल्क २० रुपये आहे. अधिक माहितीसाठी ९३७२१९७८६४ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.
कोट -
आयुष रुग्णालय सुरू व्हावे, यासाठी दोन वर्षांपासून पत्रव्यवहार सुरू होते. अखेर रुग्णालय सुरू झाल्याने नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा.
- गणेश बनकर, खारघर उपाध्यक्ष, मनसे
आयुष रुग्णालयात चांगल्या प्रकारे उपचार केले जातात. यामुळे नवी मुंबई, पनवेल आदी भागांतून रुग्ण रुग्णालयाचा लाभ घेत आहेत.
- मनेश पाटील, रहिवासी, खारघर
रुग्णालय नुकतेच सुरू झाले असून, तीन डॉक्टर, परिचारिका आणि इतर असे २० कर्मचारी आहेत. रुग्णालयात सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार केले जात आहे.
- डॉ. रमेश बावसकर, केंद्रीय होमिओपॅथी अनुसंधान संस्था (रुग्णालय) खारघर
असे आहे रुग्णालय
या रुग्णालयात ३० खाटांचा समावेश आहे. तळमजल्यावर रिसेप्सन आणि बाह्यरुग्ण विभाग असेल. दुसरा आणि तिसरा माळ्यावर प्रत्येकी १५ खाटा असतील. त्यात प्रयोगशाळा, सेमिनार हॉलचा समावेश आहे. लवकरच योगा केंद्रही सुरू करण्याचा प्रयत्न आयुष विभागाकडून सुरू आहे.