भाजपकडून खारघरला झुकते माप
पनवेल महापालिकेत निवडणुकीची मोर्चेबांधणी
खारघर, ता. १३ (बातमीदार) : पनवेल महापालिकेतील सर्वात जास्त नगरसेवक निवडून देणाऱ्या खारघरच्या पारड्यात भाजपने स्थायी समिती आणि महिला बालकल्याण आणि अ प्रभाग समिती सभापती आदी महत्त्वांच्या पदांवर नियुक्ती केली आहे. पनवेल महापालिका निवडणूक काही महिन्यांत होणार असल्यामुळे खारघरला झुकते माप दिल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
पनवेल महापालिकेची स्थापना झाल्यावर पहिल्याच निवडणुकीत खारघरमधील मतदारांनी बारा नगरसेवकांना बहुमताने निवडून दिले.
पाच वर्षांत सत्ताधाऱ्यांनी खारघरमध्ये फारसे उल्लेखनीय काम केलेले नाही. त्यात प्रशासनाने वाढीव मालमत्ता कराचा प्रस्ताव आणल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी जनतेचा विचार न करता ठराव मंजूर केला. वाढीव मालमत्ता कराच्या विरोधात नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. महापौरपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होताच पनवेल महापालिका क्षेत्रात मराठा समाज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे खारघरमधील भाजपच्या नगरसेविका लीना गरड यांनी आपल्या गळ्यात उपमहापौर पदाची माळ पडावी, यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र त्यांना यश आले नाही. यावेळी प्रशासनाकडून वाढीव मालमत्ता कराच्या नोटीस पाठविण्यात आल्यामुळे खारघरमधील रहिवासीयांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली. यावेळी गरड यांनी रहिवाशांची बाजू घेत वाढीव मालमत्ता कराचा मुद्दा उपस्थित करून सत्ताधाऱ्यांविरोधात बंड पुकारल्याने भाजपची कोंडी झाली.
पनवेल महापालिका निवडणूक जवळ येऊ लागल्याने पुन्हा खारघरवासीयांचे मन जिंकण्यासाठी आणि येणाऱ्या पालिका निवडणुकीत भाजपला बहुमत मिळावे, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून भाजपने कोपरा गावातील भाजपचे नगरसेवक ॲड. नरेश ठाकूर यांची स्थायी समिती सभापती, हर्षदा उपाध्याय यांची महिला बालकल्याण आणि संजना समीर कदम यांची अ प्रभाग समिती सभापती पदी नियुक्ती करून खारघरला झुकते माप दिल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
फोटो
नरेश ठाकूर, हर्षदा उपाध्याय आणि संजना कदम यांचे पासपोर्ट फोटो सोबत जोडले आहे