मेट्रोचे पुन्हा ‘जबाबदार व्हा, सुरक्षित व्हा’
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेवर भर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मुंबईसह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. लोकल किंवा मेट्रो प्रवासावर कोणतेही निर्बंध नसले तरी प्रवाशांना कोरोना नियमांची सक्ती करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो- १ प्रशासनाद्वारे अधिक स्वच्छतेवर भर दिला आहे. त्यासाठी मेट्रो स्थानके, मेट्रो रेकचे कर्मचाऱ्यांद्वारे निर्जंतुकीकरण केले जात असून, प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘जबाबदार व्हा, सुरक्षित व्हा’ मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
मुंबईत मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून मुंबई मेट्रो प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. कोरोना जनजागृती फलक, स्टिकर्स जागोजागी लावण्यात येत आहेत. प्रशासनाच्या वतीने प्रवाशांना तोंडावर मास्क आणि सामायिक अंतर नियम पालन करणे अनिवार्य केले आहे. प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी मुंबई मेट्रोच्या ‘जबाबदार व्हा, सुरक्षित व्हा’ मोहिमेंतर्गत विनामास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाईसुद्धा करण्यात येत आहे.
प्रत्येक मेट्रो रेक नियमितपणे निर्जंतुकीकरणानंतर सेवेत दाखल होते. मेट्रो प्रशासनाद्वारे संपूर्ण दिवस सर्व स्थानकांत, स्थानकातील शौचालये, प्रवाशांची ये-जा करण्याची ठिकाणे नियमित निर्जंतुकीकरण आणि स्वच्छ केली जात आहेत. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या नियमित गस्तीद्वारे प्रवासी कोरोना नियमांचे पालन करीत आहेत की नाही याची तपासणी केली जात आहे. यामध्ये मास्क घालणे, सामाजिक अंतर राखणे आदींवर देखरेख ठेवली जात असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाने दिली.