महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा लॉकडाऊन रोजगार
देगाव गावामध्ये मकरसंक्रांतीनिमित्त तीळगुळ विक्रीतून कमाई
माणगाव, ता. १३ (बातमीदार) : कोरोनाच्या काळात तिसऱ्या लाटेमुळे काही दिवसांपासून शाळा-महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे. अशा वेळी त्यांना गावच्या ठिकाणी अभ्यास करून बराच मोकळा वेळ मिळतो. या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करून देगाव गावातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मकरसंक्रात सणानिमित्त तीळगूळ बनवून त्याची विक्री करत आहेत. यातून आर्थिक उत्पन्न कमावण्याचा आगळावेगळा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे.
मकरसंक्रात सणासाठी मोठ्या प्रमाणात बाजारातून तीळगूळ खरेदी केला जातो. महागाईमुळे बाजारातील तीळगूळ खरेदी करणे सर्वसामान्यांना परवडत नाही. तसेच कोरोनामुळे प्रवास करणेही जोखमीचे झाले आहे. ही बाब ओळखून देगाव गावातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी गावातील ज्येष्ठ महिलांशी बोलून तीळगूळ बनवून त्यांची विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला गावातील नागरिकांनी पाठिंबा दिला. बनवलेले तीळगूळ अत्यंत माफक किमतीत देण्यास विद्यार्थ्यांनी सुरुवात केली आहे. त्यांच्या या व्यवसायात सामाजिक कार्यकर्त्यांनी कौतुकाची थाप दिली असून, त्यांच्याकडील तीळगूळ विकत घेण्यास सुरुवात केली आहे. हा तीळगूळ २५० रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. सणाच्या माध्यमातून आर्थिक कमाई करण्याचा विद्यार्थ्यांचा प्रयत्न कौतुकास्पद असून त्याचे कौतुक होत आहे. या उपक्रमात सृष्टी दिवेकर, सोनिया गायकवाड, अनुश्री गायकवाड, सलोनी गायकवाड, राज गायकवाड ,भावेश गायकवाड, निकिता गायकवाड, सुयोग दिवेकर आदींनी सहभाग घेतला आहे.
गावातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मिळून महिला मंडळ सदस्यांशी बोलून ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला. या सर्वांनी पाठिंबा दिला. महागाईमुळे तीळगूळ खरेदी करणे परवडत नाही. अशा वेळी आम्ही प्रति किलो २५० रुपयांनी तीळगूळ विक्री करत आहोत. या संकल्पनेला गाव तसेच तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- सृष्टी संतोष दिवेकर, इंजिनियरिंग विद्यार्थिनी
देगाव गावातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी गावातील महिलांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेला हा व्यवसाय कौतुकास्पद आहे. अतिशय उत्तम, चविष्ट तीळगूळ बनवून त्यांची विक्री करत आहेत. यातून स्वयंरोजगाराकडे तरुण वळतील आणि भविष्यात यातूनच उद्योग व्यावसायिक तयार होतील.
- शंकर शिंदे, पदवीधर शिक्षक