नवी मुंबई महापालिका ऑक्सिजन समृद्ध
ऐरोली, वाशी, नेरूळ रुग्णालयातद्रव रूपातील ऑक्सिजन प्लांट
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १३ : कोविडच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनमुळे रुग्णांच्या नातेवाईकांची झालेली धावपळ आणि प्रशासनाची कसरत आता संपली आहे. अत्यवस्थ रुग्णांना तत्काळ ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा करता यावा, याकरिता महापालिकेने नियोजित केलेले सर्व ऑक्सिजन प्लांट आता कार्यान्वित झाले आहे. नेरूळ, वाशी रुग्णालय आणि वाशी सिडको प्रदर्शन केंद्र व ऐरोली येथील रुग्णालयात द्रवरुपातील ऑक्सिजन प्लांट सुरु झाल्याने महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे.
कोविडच्या पहिल्या लाटेत खाटांचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. खासगी रुग्णालयांना अधिग्रहीत करून खाटांवरचा तोडगा काढला. परंतु ऑक्सिजनचा अंदाज न आल्याने कोविडच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी शेकडो रुग्णांना मृत्युचा सामना करावा लागला. पाहता पाहता उपचारासाठी आलेल्या रुग्णाला लगेच ऑक्सिजनची गरज लागल्याने प्रशासनाचीही तारांबळ उडाली होती. अगदी तासभर पुरेल इतका ऑक्सिजनचा साठा असताना महापालिका प्रशासनाला ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी धावपळ करायला लागत होती. अगदी दादागिरी करून ऑक्सिजन पुरवठादारांकडून ऑक्सिजन उपलब्ध केल्याचे अनेक किस्से वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितले जातात. परंतु हीच परिस्थिती कोविडच्या तिसऱ्या लाटेत उद्भवू नये म्हणून महापालिकेने उभारलेल्या ऑक्सिजन प्लांट आरोग्य विभागाला नवसंजीवनी देणारे ठरणार आहेत. आमदार मंदा म्हात्रे आणि आमदार गणेश नाईक यांनी त्यांच्या आमदार निधीतून देऊ केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून महापालिकेने वाशी आणि ऐरोली येथे ऑक्सिजन प्लांट सुरु केले आहेत. वायु रूपातील ऑक्सिजन फार काळ चालत नसल्याने आता महापालिकेने द्रवरूपातील ऑक्सिजनवर अधिक भर दिला आहे. नेरूळ, वाशी रुग्णालय आणि सिडको प्रदर्शन केंद्र व ऐरोली येथील रुग्णालयांमध्ये द्रवरुपातील ऑक्सिजन प्लांट तयार करण्यात आला आहे. या ऑक्सिजन प्लांटमुळे सद्या कोविडबाधित रुग्ण आणि नंतर भविष्यातील इतर आजारांवरील अत्यवस्थ रुग्णांना या ऑक्सिजन प्लांटचा चांगला फायदा होणार आहे.
-------------------------------
कुठे किती क्षमतेचे ऑक्सिजन
- ऐरोली रुग्णालयात ५८ मेट्रीक टन द्रवरूप ऑक्सिजन प्लांट
- सिडको प्रदर्शन केंद्रात ९० मेट्रीक टन द्रवरूप ऑक्सिजन प्लांट
- नेरूळच्या रुग्णालयात २० मेट्रीक टन द्रवरूप ऑक्सिजन प्लांट
-----------------------------
प्रत्येकी २०० ड्युरा सिलेंडरचा साठा
ऑक्सिजनच्या जम्बो सिलिंडरमध्ये वायुरूपात ऑक्सिजन साठवला जातो. त्याची क्षमता कमी असून एका जम्बो सिलिंडरमध्ये ७ क्युबिक मीटर ऑक्सिजन भरला जातो. त्यातुलनेत ड्युरा ऑक्सिजन सिलेंडरमध्ये द्रवरूपातील ऑक्सिजन साठवला जातो. तो अतिथंड तापमानात असतो. ड्युरा सिलिंडरमध्ये १७५ क्युबिक मीटर ऑक्सिजन भरला जातो. अंदाजे सुमारे २ टन ऑक्सिजन ड्युरा सलिंडरमध्ये साठवला जातो. एका ड्युरा सिलिंडरमध्ये २५ जम्बो ऑक्सिजन सिलेंडर इतकी क्षमता असते. अशा स्वरूपाचे २०० ड्युरा सिलिंडर महापालिकेच्या सर्व रुग्णालयात उपलब्ध केले आहेत.
--------------------------------