मुंबईतील व्यापाऱ्याला ३५ लाखांना गंडा
सुका मेवा विकून देण्याच्या बहाण्याने फसवणूक
नवी मुंबई, ता. १४ (वार्ताहर) : अफगाणिस्तानमधून मागवलेले खजूर आणि जर्दाळू विकण्याच्या बहाण्याने एपीएमसी मार्केटमधील दोघा दलालांनी मुंबईतील व्यापाऱ्याची ३४ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केली. एपीएमसी पोलिसांनी दोघा दलालांविरोधात फसवणुकीसह अपहार, तसेच धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईतील डॉकयार्ड रोड येथे मोहम्मद अलिमिया ठाकूर (वय ४२) हे राहावयास असून परदेशातून सुका मेवा आयात करून विक्री करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. एप्रिल महिन्यात त्यांनी अफगाणिस्तानमधून १३०० कार्टून खजूर व ६०२ कार्टून जर्दाळू आयात केले होते. हा सुका मेवा त्यांनी तुर्भे येथील सावळा कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवला होता. याची पाहणी करण्यासाठी मोहम्मद ठाकूर आणि त्यांचे सहकारी यासिन रौफ शेख हे डिसेंबर महिन्यात एपीएमसी मार्केटमध्ये आले असता त्यांची ओळख हार्दिक शहा या एजंटबरोबर झाली. शहा यांनी ठाकूर यांना ५० हजार रुपये रोख देऊन सुका मेवा विकत घेतला. त्यानंतर काही दिवसांत शहा याने ठाकूर व शेख यांची भेट घेत सर्व सुका मेवा तीन दिवसांत विकून त्याचे पैसे तीन ते चार दिवसांत देण्याचे आश्वासन दिले. ठाकूर यांनी शहा यांच्यावर विश्वास ठेवून त्याला व त्याचा साथीदार शांताराम यांना उर्वरित सुका मेवा विक्रीसाठी दिला.
ठाकूर यांनी सुका मेव्याच्या पैशांसाठी ३ जानेवारीला शहा आणि शांताराम यांच्याशी संपर्क साधला असता पैसे मागायचे नाहीत, पैशांसाठी वाशीत आल्यास मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी ठाकूर यांनी हार्दिक शहा आणि शांताराम यांच्याविरोधात एपीएमसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.