टॅबची किंमत चार वर्षांत दुप्पट
भाजपचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या टॅबची किंमत चार वर्षांत तब्बल दुप्पट वाढली आहे. महापालिकेने २०१७ मध्ये प्रत्येक टॅबसाठी १० हजार रुपयांचा खर्च केला होता, तर आता २० हजार ५३२ रुपयांचा खर्च करणार आहे.
महापालिका शाळेत शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पालिकेतर्फे १९ हजार ४०१ टॅबची खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी महापालिका ३० कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. हा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली असल्याचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.
भाजपने या टॅबखरेदीवर आक्षेप घेतला आहे. २०१५ मध्ये महापालिकेने खरेदी केलेल्या प्रत्येक टॅबसाठी सहा हजार ८५० रुपयांचा खर्च केला. त्यानंतर २०१७ मध्ये १० हजार रुपये दराने टॅबची खरेदी करण्यात आली. आता अवघ्या चार वर्षांच्या काळात २० हजार रुपयांपेक्षा जास्त किंमत मोजण्यात येणार आहे. चार वर्षांत दुप्पट किंमत का मोजली जात आहे, असा प्रश्न भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी उपस्थित केला. या टॅब खरेदीबाबत ऑगस्ट २०२१ पासून आतापर्यंत तीन वेळा पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र त्यावर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आता टॅबखरेदी झाली तरी ते विद्यार्थ्यांना देता येणार नाहीत. त्यामुळे हा प्रस्ताव राखून ठेवून विस्तृत चर्चा करण्याची गरज होती. मात्र प्रस्ताव मंजूर करण्यात आला, अशी नाराजीही शिंदे यांनी व्यक्त केली.
...