२४ तासात ३६६ पोलिस कोरोनाबाधित
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ ः कोरोनाचा राज्यभर कहर सुरू आहे. रोजच फिल्डवर असणारे पोलिसही यातून सुटलेले नाहीत. एकाच दिवसात मुंबई पोलिसांमध्ये ३६६ पोलिस कोरोनाबाधित झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. गेल्या २४ तासांतला हा उच्चांकी आकडा आहे. बुधवारी एका दिवसात बाधित होणाऱ्या पोलिसांची संख्या १४५ होती. ती आता ३६६ वर पोहोचली आहे; तर राज्यातल्या गेल्या २४ तासांतल्या बाधित पोलिसांची संख्या ४५३ इतकी आहे.
सध्या मुंबईत १२५३ पोलिस कोरोनाबाधित आहेत; तर राज्यभरात २८९० पोलिस बाधित आहेत. तसेच राज्यभरात १०९६ पोलिस अधिकारी आणि ८५६ पोलिस कर्मचारी विलगीकरणात असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. फिल्डवर असलेले आणि कोरोनाबाधित झालेल्या मुंबई पोलिस कर्मचाऱ्यांना काही लक्षणे दिसत नाहीत आणि त्रासही होत नाही. पण चाचणी केल्यावर मात्र पॉझिटीव्ह येत आहेत.
पोलिसांत पॉझिटिव्हिटी रेट जास्त असला तरीही मृत्युदर मात्र एकदम कमी आहे. तरीही सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
पोलिसांत कोरोनाचा कमीत कमी प्रसार व्हावा यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.