म्हाडाची मास्टर लिस्ट बंद होणार
आजवर अर्ज न केलेल्या रहिवाशांना अखेरची संधी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : भ्रष्टाचाराचे कुरण ठरलेली आणि सतत वादात सापडणारी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाची मास्टर लिस्ट अखेर कायमची बंद करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. त्यासाठी गेली अनेक दशके संक्रमण शिबिरात खितपत पडलेल्या मूळ उपकरप्राप्त इमारतींमधील रहिवाशांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत. मंडळाकडून रहिवाशांना मास्टर लिस्टमधील घर देण्यासाठी ही अखेरची संधी देण्यात येणार असल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
मूळ उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास होऊ शकत नसल्याने संक्रमण शिबिरात खितपत पडलेल्या नागरिकांना हक्काचे घर देण्यासाठी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून मास्टर लिस्ट जाहीर करण्यात येते. मंडळाकडून हक्काचे घर मिळेल, या आशेवर हे रहिवासी गेली चार दशके संक्रमण शिबिरांमध्ये राहत आहेत. उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासातून म्हाडाला मिळणारी घरे मास्टर लिस्टच्या माध्यमातून देण्यात येतात; मात्र यामध्ये दलाल आणि म्हाडा अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. याच कारणावरून नुकतीच गृहनिर्माण विभागाने मास्टर लिस्टला स्थगिती दिली होती. त्यानंतर मूळ रहिवाशांना न्याय देण्यासाठी गृहनिर्माण विभागाने मास्टर लिस्टवरील स्थगिती उठवली होती; मात्र विधानसभा अधिवेशनातही मास्टर लिस्ट कधी बंद होणार, याविषयी लोकप्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित केले होते. याची दखल घेऊन मास्टर लिस्टची सर्व प्रकरणे अखेर निकाली काढण्याचे मंडळाने ठरवले आहे. त्यानुसार मंडळाकडे यापूर्वी सुनावणीसाठी आलेली प्रकरणेही मार्गी लावण्यात येणार आहेत. तसेच, उपकार प्राप्त इमारतींमधून संक्रमण शिबिरात हलविण्यात आलेल्या आणि गेली अनेक वर्षे अर्ज न केलेल्या रहिवाशांना मास्टर लिस्टचे घर वितरित करण्यासाठी अखेरची संधी देण्याचे मंडळाने ठरवले आहे.
कोट
पुनर्विकास प्रकल्पांमधील घरांसाठी येत्या काही दिवसांमध्ये मूळ रहिवाशांकडून अर्ज मागविण्यात येतील. हे अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र होणाऱ्या रहिवाशांना घराचे वितरण करण्यात येईल. त्यानंतर मास्टर लिस्टसाठी अर्ज मागविण्यात येणार नाही.
- विशाल देशमुख, उपमुख्य अधिकारी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ.