सोमय्या महाविद्यालयात बहुभाषिक ‘मंथन’
घाटकोपर, ता. २४ (बातमीदार) ः के. जे. सोमय्या कला आणि वाणीज्य महाविद्यालयात नुकतेच बहुभाषिक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या ‘मंथन’ व्यासपीठाद्वारे आयोजित या व्याख्यानमालेत मराठी, हिंदी, संस्कृत आणि गुजराती या चार भाषांमधल्या लोकसाहित्याच्या पैलूंवर चर्चा करणारी व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.
मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या डॉ. शामल गरूड यांनी लोकसाहित्याचे पुष्प गुंफताना ‘तमाशा समजून घेताना’ या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण भाष्य केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या आणि मराठी विभागप्रमुख डॉ. वीणा सानेकर यांनी भाषांमधील संवाद अधिक समृद्ध करणे हे या व्याख्यानमालेच्या आयोजनाचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. गुजराती भाषेचे पुष्प गुंफताना गांधीनगर येथील डॉ. राजेश मकवाना यांनी ‘लोककलेच्या जगात डोकावताना’ या विषयावर लोककथांच्या अनुषंगाने भाष्य केले. पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे डॉ. सदानंद भोसले यांनी ‘हिंदी भाषेतील लोकसाहित्य आणि लोकशिक्षण’ या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन केले. मुंबई विद्यापीठातील संस्कृत विभागाच्या प्रा. रेणुका पांचाळे यांनी `लोककथा आणि कला’ यावर भाष्य केले.
...