खोटे सोने देऊन सराफाला गंडा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ ः सोनारालाच खोटे सोने देऊन फसवण्यात आल्याची घटना मुंबईत उघडकीस आली आहे. विरेंद्र जैन असे फसवणूक झालेल्या ज्वेलरचे नाव असून परवेझ कुरेशी असे फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
पत्नी गरोदर असून तिच्या उपचारांसाठी पैसे हवेत, त्यासाठी सोने गहाण ठेवून मला पैसे द्या, असे सांगत परवेझ कुरेशी त्याच्या गरोदर बायकोसह काही महिन्यांपूर्वी विरेंद्र जैन यांच्या दुकानात आला होता. त्याने गहाण ठेवण्यासाठी त्याच्या पत्नीचे सोन्याचे झुमके दिले, त्या बदल्यात विरेंद्र जैन यांनी दागिना तपासून २५ हजार रुपये दिले. त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी तो पुन्हा एकदा आणखी एक दागिना घेऊन आला, त्याचेही जैन यांनी त्याला काही पैसे दिले, असे करत परवेझ कुरेशी याने जैन यांच्याकडे ४ दागिने सोन्याचे म्हणून गहाण ठेवले आणि जैन यांच्याकडून १ लाख ४० हजार रुपये घेतले.
काही दिवसांनी जैन हे मेंबर असलेल्या ज्वेलर्सच्या व्हॉटसअप ग्रुपवर एका व्यक्तीचा फोटो शेअर करत एका ज्वेलरने त्या व्यक्तीपासून सावध राहण्याचा इशारा दिला होता, ही व्यक्ती खोटे दागिने देऊन पैसे घेते, असे त्या मेसेजमध्ये नमूद करण्यात आलेले होते. जैन यांनी तो फोटो ओळखला, आपल्याकडूनही या व्यक्तीने पैसे घेतले आहेत हे त्यांच्या लक्षात आले, त्यांनी तातडीने रिझवानने दिलेले दागिने वितळून तपासायला सांगितले, तर त्यांची शंका खरी ठरली, ते दागिने वितळवले तेव्हा ते सोने नाही दुसराच धातू असून त्याला फक्त सोन्याचे पॉलिश करण्यात आल्याचे उघड झाले.
त्यानंतर विरेंद्र जैन यांनी परवेझने दिलेल्या पत्त्यावर शोध घेतला, तो तिथे नव्हता, त्यांनी त्या परिसरात त्याला शोधल्यावर तो सापडला, मी तुमचे पैसे परत देतो असे सांगून त्याने वेळ मागितला, पैसे परत मिळणार असतील तर वेळ देऊयात, असा विचार करून विरेंद्र जैन यांनी त्याला काही वेळ दिला, मात्र अनेक दिवस झाले तरीही परवेझने त्यांचे पैसे परत केले नाही, तेव्ही जैन यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
विरेंद्र जैन यांच्यासोबत त्याने आणखी काही ज्वेलर्सनाही फसवल्याची माहिती आहे, परवेझ आणि त्याच्या पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
...