
एमआयडीसीत डेब्रिज माफियांचा धुमाकूळ
वाशी : एमआयडीसी परिसरामध्ये डेब्रिज माफियांनी धुमाकूळ घातला आहे. शेकडो डम्परमधून डेब्रिज एमआयडीसीच्या भूखंडावर खाली केले जात आहे. एमआयडीसीच्या ऐरोली येथील पार्किंगच्या भूखंडावर डेब्रिजचे डोंगर निर्माण झाले आहे. एमआयडीसीच्या जलवाहिनीलगतही डेब्रिज टाकण्यात येत आहेत. रबाळे, महापे येथील भूखंडही डेब्रिजमाफियांनी काबीज केले आहेत. ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये डेब्रिजची अनधिकृत डम्पिंग ग्राउंड तयार होऊ लागली आहेत. काही वर्षांपूर्वी अडवली- भुतवलीमध्ये हजारो डम्परमधून डेब्रिजचा भराव करण्यात आला होता.
शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर तेथील अतिक्रमण काही प्रमाणात थांबले. मात्र डेब्रिजमाफियांनी इतर परिसरामध्ये नवीन डम्पिंग ग्राउंड तयार केले आहे. इंदिरानगरमधील शांताबाई जामा सुतार उद्यान व हिरादेवी मंदिर परिसरामधील नैसर्गिक नाल्यात मोठ्या प्रमाणात डेब्रिजचा भराव करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे एमआयडीसीच्या मोकळ्या भूखंडासह, पार्किंगच्या राखीव भूखंडावर, एमआयडीसी जलवाहिनीलगत, एमआयडीसीच्या मुख्य रस्त्यालगत शेकडो डम्परमधून डेब्रिज टाकले जात असून, महापालिका व एमआयडीसी प्रशासन या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. रात्रीच्या वेळी मोकळे भूखंड, रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकले जाते. शहरात नागरिकांनी घरदुरुस्ती करून निघालेला प्लास्टरचा कचरा मोकळ्या जागेवर टाकण्याचा प्रयत्न केल्यास महापालिकेचे भरारी पथक तत्काळ कारवाई करते; परंतु शेकडो डम्पर खाली करणाऱ्या माफियांना मात्र अभय दिले जात आहे. एमआयडीसीमध्ये जागा मिळेल त्या ठिकाणी भराव सुरू असून भविष्यात त्याचे गंभीर परिणाम शहरवासीयांना सहन करावे लागणार आहेत.
राजकीय पदाधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने डेब्रिज एमआयडीसी परिसरात टाकले जात आहे. या डेब्रिजमुळे डासांचा प्रार्दुभाव वाढल्याने रोगराई निर्माण होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात डेब्रिजमुळे जागोजागी पाणी साचते. पाण्याचा निचरा होण्यास मार्गच नसतो. डेब्रिज टाकल्याने सुस्थितीतील भूखंडाची अवस्था दयनीय होत आहे. यासंदर्भात पालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त अमरिश पटनीगिरी यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. चौकट मुंबई-ठाण्यातील कचरा नवी मुंबईत नवी मुंबई परिसर डेब्रिजचे डम्पिंग ग्राउंड झाले आहे. ठाणे व मुंबईतील बांधकामाचा कचरा एमआयडीसीमध्ये टाकला जात आहे. शेकडो डम्परमधून डेब्रिज आणले जात आहे. नागरिक याविषयी तक्रारी करत असतानाही भरारी पथक बघ्याची भूमिका घेत आहे. चौकट एमआयडीसीच्या भूखंडावर डेब्रिज टाकण्यात येत असले तरी महापालिकेच्या डेब्रिज भरारी पथकाने कारवाई करणे अपेक्षित आहे. - एस. एम. गित्ते, उपअंभियता, एमआयडीसी.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..