मुंबई पालिकेत प्रशासक
एप्रिलमध्ये निवडणुकांची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : मुंबई पालिकेच्या आगामी निवडणुका एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे; तर पालिकेची मुदत ८ मार्च रोजी संपणार आहे. त्यामुळे या कालावधीत पालिकेचा संपूर्ण कारभार आयुक्तांच्या हाती जाणार आहे.
मुंबईतील प्रभागांच्या सुधारित रचनेचा मसुदा उद्या १ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. त्यानंतर सूचना आणि हकरती मागवून ही प्रक्रिया २ मार्चपर्यंत चालणार आहे.
यानंतर पुन्हा प्रभागांचे आरक्षण निश्चित करून त्यावर सूचना आणि हकरती मागवल्या जातील. ही प्रक्रिया मार्चच्या मध्यावधीस संपण्याची शक्यता आहे; तर दुसऱ्या बाजूला पालिकेची मुदत ८ मार्च रोजी संपणार आहे. मात्र, त्याआधी पालिकेची निवडणूक होण्याची शक्यता नाही. निवडणूक तारखेच्या ४५ दिवस आधी आचारसंहिता जाहीर करावी लागणार असल्याने निवडणूक एप्रिल किंवा मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेची मुदत संपल्यावर पालिका बरखास्त होऊन कारभार पालिका प्रशासनाच्या हाती जाण्याची शक्यता आहे.
याआधी १९९२ मध्ये पालिकेला दोन वर्षांची मुदत देण्यात आली होती. मात्र, आता केंद्र आणि राज्याच्या विविध कायद्यांत बदल झाल्याने पालिकेला मुदतवाढीची शक्यता कमीच असल्याचे मानले जात आहे. तसे संकेत पालिका प्रशासनाकडून मिळत आहेत.
...
अंतिम निर्णय राज्य सरकारचा
मुंबईला विशेष बाब म्हणून अंतिम निर्णय राज्य सरकारकडून घेतला जाऊ शकतो. राज्यात आणि पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे नगरसेवकांना मुदतवाढ देण्याचा विचार केला जाऊ शकतो. मात्र, प्रशासनाच्या हाती कारभार गेल्यानंतर त्यावर थेट अंकुश राज्य सरकारचा राहाणार आहे. याशिवाय नवी मुंबई आणि वसई-विरार पालिकेत सध्या प्रशासक आहे. मात्र, या दोन्ही पलिकांमध्ये शिवसेनेचे मोठे अस्तित्व नाही. त्यामुळे पालिकेबाबत राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
...