केडीएमसीतही निवडणुकीची धामधूम, मंगळवारी प्रभाग रचना जाहीर होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kalyan dombivli municipal corporation
केडीएमसीतही निवडणुकीची धामधूम, मंगळवारी प्रभाग रचना जाहीर होणार

केडीएमसीतही निवडणुकीची धामधूम, मंगळवारी प्रभाग रचना जाहीर होणार

sakal_logo
By

कल्याण, ता. ३१ (बातमीदार) : कोरोनामुळे राज्यातील पालिकांच्या लांबणीवर पडलेल्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या असून, पालिका प्रशासनांना प्रारूप प्रभाग रचनांचे आराखडे, प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार कल्याण-डोंबिवली महापालिकेचा प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडाही मंगळवारी (१ फेब्रुवारी) प्रसिद्ध होणार असून, १४ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना मागविल्या जाणार आहेत. या प्रक्रियेमुळे इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. (Electoral Wards in Kalyan Dombivli)

हेही वाचा: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पाच माजी आयुक्तांसह 18 जणांवर गुन्हा दाखल

कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक ऑक्टोबर २०२० मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली. २०१५ मध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक झाली होती. त्यावेळी १२२ प्रभागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. आता आगामी निवडणूक पॅनेल पद्धतीने घेण्यात येणार असून निवडणूक आयोगाने प्रभागांमध्ये ११ ने वाढ केल्याने आता प्रभागांची संख्या १३३ झाली असून ही निवडणूक ४४ पॅनेलमध्ये होणार आहे.

दरम्यान, कोरोना रुग्णाची संख्या कमी झाल्याने आता निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार पालिकेच्या निवडणुकीसाठीचा प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा मंगळवारी (ता. १) प्रसिद्ध होणार आहे. त्यावर १४ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना मागविल्या जाणार असून, प्राप्त हरकती १६ फेब्रुवारीला आयोगाला सादर कराव्या लागणार आहेत. २६ फेब्रुवारीला या हरकतींवर सुनावणी घेण्यात येणार असून, सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशी २ मार्च २०२२ ला निवडणूक आयोगाला पाठवाव्या लागणार आहेत. त्यानुसार पालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, मंगळवारी प्रभागरचना कशा प्रकारे जाहीर होणार, याकडे सर्व इच्छुकांचे लक्ष लागले आहे. (Kalyan Dombivli Municipal Corporation election 2022)

हेही वाचा: डोंबिवली : आजारातून बरं करण्यासाठी भोंदूबाबाने मागितली सोन्याची जीभ

२७ गावांसहित होणार प्रभाग रचना कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील २७ गावांचे प्रकरण न्यायालयामध्ये असल्याने निवडणूक आयोगाने कुठलीही सूचना दिलेली नाही. त्यामुळे सध्या तरी २७ गावांसह प्रभाग रचना जाहीर होणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. एप्रिलमध्ये निवडणूक राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार १ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत निवडणूक प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यानुसार कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

कागदोपत्री माहितीचा प्रस्ताव

१) सदस्यसंख्या व आरक्षणाची परिगणना, हद्दींची व्याप्ती व वर्णनाबाबत निवडणूक प्रभागांमध्ये समाविष्ट प्रगणक गट व लोकसंख्या, प्रगणक गटनिहाय माहिती, अनुसूचित जातीचा आणि अनुसूचित जमातीचा प्रभागनिहाय उतरता क्रम, सदस्य संख्या व आरक्षणाचे एकत्रित विवरणपत्र, प्रगणक गटाचे विभाजन करताना द्यावयाचे प्रमाणपत्र, समितीने प्रारूप प्रभाग रचनेबाबत द्यावयाचे प्रमाणपत्र अशी सविस्तर कागदोपत्री माहितीचा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना पालिकेला करण्यात आल्या आहेत.

२) महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचना आणि आरक्षण सोडत एकाच दिवशी जाहीर केली जाते; परंतु ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून, महापालिका निवडणुकीची प्रक्रिया थंडावली होती. ओबीसींच्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना आगोदर जाहीर करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top