भिवंडी पालिका नोकर भरतीत भ्रष्टाचार; PMO ने घेतली दखल
भिवंडी, ता. १४ (बातमीदार) : भिवंडी महापालिकेत सन २०११- २०१२ मध्ये (Bhiwandi municipal corporation) झालेली मागासवर्गीय सरळ सेवा नोकर भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाला होता. या प्रकरणी संबंधितांनी तब्बल पाच वर्षे सरकार दरबारी लढा देऊन न्याय मिळविल्यानंतर लोकायुक्तांनी अधिकाऱ्यांना संबंधित कर्मचाऱ्यांना नोटिसा देऊन अंतिम कार्यवाही करण्याचे आदेश २३ डिसेंबर २०१६ रोजी दिले. मात्र त्यावर अजूनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मात्र, आता या प्रकरणाची दखल थेट पंतप्रधान कार्यालयाने घेतली आहे. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) दखल घेऊन भिवंडी पालिकेतील नोकरी भरती प्रकरणी सखोल चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिवांना दिले. त्यामुळे सचिवांनी महापालिका प्रशासनाने तातडीने अहवाल सादर करावा, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे पालिका आयुक्त कार्यालयात खळबळ उडाली आहे.
भिवंडी पालिका नोकर भरती भ्रष्टाचार प्रकरणी सरकार व लोकायुक्तांनी दिलेल्या आदेशांची पायमल्ली करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी तक्रारदार संगीता नरोटे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. तक्रार करताच पंतप्रधान कार्यालयाने दखल घेऊन भिवंडी पालिकेतील नोकरी भरती प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले.
भिवंडी पालिकेस मुख्य सचिवाचे आदेश येऊनसुद्धा अद्याप कोणताही अहवाल सरकारकडे पाठविण्यात आला नसल्याची माहिती पालिका वर्तुळातून देण्यात आली आहे.
भिवंडी पालिकेतील मागासवर्गीय सरळ सेवा भरती प्रक्रियेत अनुत्तीर्ण असलेल्यांना उत्तीर्ण दाखवून त्यांच्यासह अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना या भरती प्रक्रियेमध्ये नोकऱ्यांची खिरापत वाटल्याबाबत या नोकर भरतीत पात्र असताना डावलले गेलेल्या तक्रारदार महिला संगीता ओंकार नरोटे या महिलेने शासन व लोकायुक्तांकडे दाद मागितली. लोकायुक्तांनी १७ डिसेंबर २०१६ रोजी या प्रकरणी चौकशी व सुनावणी घेऊन निकाल देताना या भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठेवत शासनास भरती रद्द करण्याचे आदेश दिले. त्यामुळे तत्कालीन आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या भरती प्रक्रियेतून सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नोटिसा बजावत कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी अर्थकारण करीत दुर्लक्ष केले.
उपोषणाचा इशारा
नगर विकास विभागाने भिवंडी पालिका आयुक्तांना तातडीने अहवाल सादर करावा, असे निर्देश पत्र पाठविले आहे. मात्र, पालिका प्रशासन त्या पत्राकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप करत तक्रारदार संगीता नरोटे यांनी केला आहे. पालिकेच्या या गलथान कारभाराविरोधात उपोषणाला बसणार असल्याचा इशारादेखील त्यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.