भाईंदर : पाचशे फुटांपर्यंतच्या मालमत्तांना करमाफी नाहीच! BMC | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mira bhayandar municiple corporation
भाईंदर : पाचशे फुटांपर्यंतच्या मालमत्तांना करमाफी नाहीच !

भाईंदर : पाचशे फुटांपर्यंतच्या मालमत्तांना करमाफी नाहीच!

भाईंदर : मुंबई महापालिकेच्या (BMC) धर्तीवर मिरा-भाईंदरमधील (Mira Bhayandar) ५०० चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्तांना (500 square feet properties) करमाफी देण्याचा विषय बारगळणार आहे. करमाफी दिल्यामुळे पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होईल. त्यामुळे करमाफी देण्याच्या ठरावाचा (tax relief proposal) पुनर्विचार करावा, असे पत्र आयुक्त दिलीप ढोले (dilip dhole) यांनी महापौरांना दिले आहे. त्यामुळे सध्या तरी करमाफीच्या प्रस्तावाची अंलबजावणी प्रशासनाकडून केली जाणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा: रायगड : २३५ ग्रामपंचायतींची प्रभाग सीमा निश्चिती अंतिम टप्प्यात

जानेवारी महिन्यात पार पडलेल्या महासभेत सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर ५०० चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्तांना संपूर्ण करमाफी देण्याचा प्रस्ताव संमत केला होता. करमाफी केल्यानंतर पालिकेला येणाऱ्या तुटीची रक्कम भरपाई म्हणून सरकारकडून दर वर्षी अनुदान स्वरूपाने घेण्यात यावी, तसेच त्याची तरतूद पालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात करण्यात यावी, असेही या प्रस्तावात नमूद करण्यात आले होते. महासभेने प्रस्ताव संमत केल्यानंतर महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यात यावी, असे पत्र आयुक्त दिलीप ढोले यांना दिले होते. या पत्राचे उत्तर आयुक्तांनी आता महापौरांना दिले आहे.

काय म्हटले पत्रात ?

१) मालमत्ता करमाफी केल्यास पालिकेला दर वर्षी ६६ कोटी रुपये तसेच दरवर्षी नव्याने निर्माण होणाऱ्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्तांवरील कर आकारणीद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. या आर्थिक तुटीचा विकासकामांवर परिणाम होईल. तसेच या तुटीच्या बदल्यात सरकारकडून अनुदान प्राप्त होईल, याची शाश्वती नाही.
२) परिणामी महासभेने मंजूर केलेल्या मालमत्ता करमाफीच्या प्रस्तावाचा पुनर्विचार करण्यात यावा. तसेच करमाफीमुळे येणाऱ्या आर्थिक तुटीच्या बदल्यात सरकारकडून अनुदान प्राप्त झाल्यानंतरच पुढील कार्यवाही करणे सुलभ होईल, असे मत आयुक्त दिलीप ढोले यांनी महापौरांना दिलेल्या पत्रात व्यक्त केले आहे.

महासभेने करमाफी देण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. आता त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनावर आहे. प्रशासनाने एकतर या प्रस्तावाची अंमलबजावणी करावी, अन्यथा मंजूर केलेला प्रस्ताव प्रशासनाला मान्य नसेल तर तो रद्द करण्यासाठी सरकारकडे पाठवावा. यासंदर्भात आयुक्तांना पुन्हा पत्र देण्यात येणार आहे.
- ज्योत्स्ना हसनाळे, महापौर, मिरा-भाईंदर

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BMCtaxbhayandar
go to top