फक्त ०.१ टक्के गर्भवती कोरोना ग्रस्त

फक्त ०.१ टक्के गर्भवती कोरोना ग्रस्त

गर्भवतींना संसर्ग कमी
तिसऱ्या लाटेत फक्त ०.१ टक्के गर्भवती कोरोनाग्रस्त

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन प्रकारामुळे आलेल्या तिसऱ्या लाटेच्या विळख्यात नागरिक मोठ्या संख्येने सापडले. मात्र त्या तुलनेत ही लाट गर्भवतींसाठी सौम्य ठरली. दोन्ही लाटांच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत गर्भवतींना कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. पालिका आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार १.२५ लाख गर्भवती महिलांपैकी केवळ ०.१ टक्के गर्भवती महिलांना या लाटेत लागण झाली आहे. बहुतेक गर्भवती महिलांनी कोरोनाविरुद्धच्या युद्धात ढाल बनलेली कोरोना लसदेखील घेतली असल्याचे सांगण्यात आले.
२१ डिसेंबर रोजी मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने दार ठोठावले. ही लाट इतकी वेगाने पसरली की एका दिवसात येथे २० हजार नवीन रुग्ण आढळले. पालिका आरोग्य विभागाकडून जारी करण्यात येणारा दैनंदिन कोरोना अहवाल पाहिला तर या तिसऱ्या लाटेत आतापर्यंत ३ लाख ८७ हजार २४६ जणांना लागण झाली आहे. त्यापैकी २०० हून अधिक गर्भवती महिलांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. जर या आकड्यांचे मूल्यांकन केले तर ५९ दिवसांत केवळ ०.०१ टक्के महिला कोविड पॉझिटिव्ह आढळल्या आहेत.

तुलनेत कमी संख्या...
पालिका आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत गर्भवती महिलांना कमी संसर्ग झाला आहे. पहिल्या लाटेत मार्च २०२० ते डिसेंबर २०२० पर्यंत १,४७२ गर्भवती महिलांना कोरोनाची लागण झाली, तर जानेवारी २०२१ ते नोव्हेंबर २०२१ पर्यंतच्या दुसऱ्या लाटेत ५४१ महिला कोविड पॉझिटिव्ह आढळल्या. तिसऱ्या लाटेत डिसेंबर २०२१ पासून आतापर्यंत फक्त २०० गर्भवती महिलांना कोरोनाची लागण झाली आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात?
जे. जे. रुग्णालयाच्या स्त्री-रोग विभागाचे प्रमुख डॉ. अशोक आनंद यांनी सांगितले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत गर्भवती महिलांच्या संसर्गाचा पुरावा नसण्याची दोन मुख्य कारणे आहेत. पहिले कारण तिसरी लाट खूप मध्यम स्वरूपाची होती. लक्षणे नसलेल्या अनेक गरोदर महिलांना कोरोना असल्याची माहितीही नव्हती आणि ज्या महिलांना लक्षणे दिसून आली त्यांची चाचणी केल्यानंतर त्या कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आणि तेवढाच आकडा समोर आला. दुसरे कारण म्हणजे दक्षता होय. दोन लाटांपासून धडा शिकल्याने महिलांनी गर्भधारणेदरम्यान खूप काळजी घेतली. कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केले. मास्क वापरला आणि गर्दी टाळली. या सतर्कतेमुळे तिसरी लाट त्यांच्यासाठी सौम्य ठरली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com