‘झेब्रा पट्टा’ कोणासाठी?
sakal media

‘झेब्रा पट्टा’ कोणासाठी?

पुणे, ता. २३ ः वेळ सकाळी १० वाजताची. फर्ग्युसन महाविद्यालयासमोरील चौक. ज्येष्ठ दांपत्य, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात होती. मात्र, अशा पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी असलेल्या ‘झेब्रा पट्ट्यां’वरच एक, दोन नव्हे तर ४-५ दुचाकी थांबलेल्या. त्यांच्यातूनच कशीबशी वाट काढीत, अडथळ्यांची शर्यत पार करून ज्येष्ठ, विद्यार्थी अखेर एकदाचे रस्त्याच्या पलिकडे पोचले आणि त्यांचा जीव भांड्यात पडला! ज्यांच्यासाठी झेब्रा पट्ट्या आहेत, त्यांच्याऐवजी काही वाहनचालकांसाठीच खास झेब्रा पट्ट्या लावल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे. झेब्रा पट्ट्यांवर थांबणाऱ्या अशा सुमारे नऊ हजारांहून अधिक वाहनचालकांवर दंडाचा बडगा उगारण्यात आला, परंतु अजूनही बेशिस्त वाहनचालकांची सुधारण्याची काही चिन्हे दिसत नसल्याचे वास्तव आहे.
सर्वसामान्य वाहनचालकांना रस्ता सुरक्षितपणे ओलांडता यावा, यासाठी झेब्रा पट्ट्यांचा वापर केला जातो. शहरातील बहुतांश सुज्ञ नागरिक या झेब्रा पट्ट्यांच्या मागेच थांबू पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सुरक्षित मार्ग मोकळा करून देत असल्याचे चित्र आपण शहरातील काही मोजक्‍या चौकांमध्ये पाहिले असेल. परंतु अनेक ठिकाणी याच झेब्रा पट्ट्यांवर वाहने उभी करून काही बेशिस्त वाहनचालक पादचाऱ्यांच्या मार्गात अडथळे उभे करण्याचा प्रकार करीत असल्याचेही दिसून आले आहे. विशेषतः अनेक ठिकाणी वाहतूक पोलिसांसमोरच अनेक चौकात वाहनचालक झेब्रा पट्ट्यांवर मोठ्या ऐटीत थांबत असूनही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे त्यांना वाटते. त्यातूनच पुढे कायम झेब्रा पट्टा हा वाहने थांबविण्यासाठीच असल्याप्रमाणे वाहने तेथे थांबविली जात असल्याची सद्यःस्थिती आहे.
शहरातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, स्वारगेट येथील जेधे चौक, डेक्कन, टिळक चौक, दांडेकर पूल, मध्यवर्ती शहरातील प्रमुख चौकांसह बहुतांश चौकांमध्ये वाहनचालक झेब्रा पट्ट्यांवरच वाहने उभी करीत असल्याचे चित्र आजही सुरुच आहे.

सुधारणार तरी कधी?
मागील १४ महिन्यांत शहरातील वेगवेगळ्या चौकांमधील ९ हजार ३१४ वाहनचालक झेब्रा पट्ट्यांवर थांबल्याचे वाहतूक पोलिसांना आढळून आले. तसेच चौका-चौकातील सीसीटीव्हीद्वारेही अशा बहाद्दर वाहनचालकांची छायाचित्रे घेतली जातात. याच ९ हजार ३१४ वाहनचालकांना तब्बल १८ लाख ४५ हजार इतका दंड आकारण्यात आला आहे. त्यांच्याकडून दंड वसुलीसाठी पोलिसांकडून त्यांना ई-चलन, नोटीसही बजावण्यात आली. काही वाहनचालकांनी दंड भरून आपल्यात सुधारण्यात घडविण्याचे काम केले. परंतु अजूनही अनेक वाहनचालकांकडून झेब्रा पट्ट्यांचा वापर वाहने चालविण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे वाहनचालकांवर अडथळ्यांची शर्यत पार करीत रस्ता ओलांडण्याची कसरत करावी लागत आहे.

चौकातून पादचारी सिग्नल गायब
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकासह अनेक चौकांमध्ये पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे जिकिरीचे बनले आहे. झेब्रा पट्ट्यांवर वाहने थांबत आहे, तर दुसरीकडे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी ठेवलेल्या पादचारी सिग्नलचाही अनेक चौकात मागमूसही नाही. तर काही ठिकाणी पादचारी सिग्नलच्या वेळातच वाहने सुसाट निघत असल्याने पादचाऱ्यांना रस्ता ओलांडता येत नाही. रहदारीच्यावेळी तर अक्षरशः जीव मुठीत घेऊन, अन्य नागरिकांच्या मदतीने पादचारी रस्ता ओलांडत असल्याचे चित्र दिसत आहे.

शिस्त की कारवाई?
मागील वर्षी नऊ हजार जणांनी झेब्रा पट्ट्यांवर वाहने उभी केली. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाईही केली. परंतु, या वर्षातील पहिल्या दोन महिन्यांत जानेवारी व फेब्रुवारीमध्ये अवघ्या ११ जणांनीच झेब्रा पट्ट्यांवर वाहने उभी केल्याचे पोलिसांची आकडेवारी सांगत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये शिस्त येत आहे की पोलिस कारवाई करण्याचे टाळत आहेत, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

झेब्रा पट्ट्यांवर थांबलेल्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून

वेळोवेळी कारवाई केली जात आहे. सीसीटीव्हीद्वारे त्यांच्यावर कारवाई करून दंडाची रक्कम आकारली जात आहे. वाहनचालकांनी सिग्नल लागल्यानंतर आपली वाहने झेब्रा क्रॉसिंगच्या मागे थांबविण्याच्या नियमांचे पालन करावे. परिणामी पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता येईल आणि अपघातही टळतील.
- राहुल श्रीरामे, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा

वर्ष-------झेब्रा पट्ट्यावर थांबलेले वाहनचालक-------------- दंडाची रक्कम
२०२०-------- २२ हजार ८७०------------------ ४५ लाख ७२ हजार रुपये
२०२१------ ९ हजार ३०३-------------------१८ लाख ४५ हजार ८०
२०२२ (फेब्रुवारी अखेरपर्यंत) ११ -----------------

़़़़़़़़़़़़़

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com