
भाईंदर: अर्थसंकल्पात सुमारे पंचवीस कोटींची वाढ; बहुमताच्या जोरावर भाजपची मंजुरी
भाईंदर : स्थायी समितीने (Standing committee) शिफारस केलेल्या मिरा-भाईंदर पालिकेच्या (Mira-bhayandar municipal corporation) अर्थसंकल्पात सुमारे २५ कोटी रुपयांची वाढ (twenty five crore in budget) करून महासभेत २,२५२ कोटी ६५ लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला अंतिम मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभापतींनी महापौरांकडे सादर केलेल्या अर्थसंकल्पाला सत्ताधारी भाजपने (bjp) बहुमताच्या जोरावर मंजुरी दिली; मात्र विरोधकांनी हा अर्थसंकल्प अवास्तव फुगवण्यात आला असल्याची टीका करून अर्थसंकल्पाला विरोध केला.
हेही वाचा: नवीन गृहप्रकल्प तहानलेलेच! सिडको वसाहतींच्या तोंडचे पाणी पळाले
प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात सुमारे ४१० कोटी रुपयांची वाढ स्थायी समितीने केली होती. मालमत्ता कर, इमारत बांधकाम परवानगी, मोकळ्या जागांचा कर अशा विविध उत्पन्नाच्या बाबींमध्ये ही वाढ करण्यात आली होती. त्याचप्रमाणे खर्चाच्या बाजूतही वाढ करण्यात आली होती. स्थायी समितीने मंजूर केलेला अर्थसंकल्प सभापती राकेश शहा यांनी बुधवारी पार पडलेल्या विशेष महासभेत महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांच्याकडे सुपूर्द केला. या अर्थसंकल्पात महासभेने सुमारे २५ कोटी रुपयांची वाढ केली.
शहरात सुरू असलेल्या भूमिगत गटार योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद या वेळी अर्थसंकल्पात करण्यात आली. यातील १५ कोटी रुपये सरकारकडून अनुदान म्हणून मिळणार आहेत; तर उर्वरित पाच कोटी रुपये कर्जाद्वारे उभे करण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त पाण्याच्या डिजिटल मीटरसाठीदेखील अर्थसंकल्पात पाच कोटी रुपयांची तरतूद नव्याने करण्यात आली आहे. सभागृह नेते प्रशांत दळवी यांनी अर्थसंकल्पाला मान्यता देण्याचा प्रस्ताव सभागृहात मांडला.
हेही वाचा: रायगड : बेघरांच्या घरांचे स्वप्न होणार साकार; दोन हजार ९६६ घरांचे उद्दिष्ट
अर्थसंकल्पाला विरोधी पक्षांकडून तीव्र विरोध करण्यात आला. अर्थसंकल्प अवास्तव फुगवण्यात आल्याची टीका काँग्रेसचे नगरसेवक अनिल सावंत यांनी केली. दरवर्षी अर्थसंकल्पात अवास्तव वाढ करण्यात येते; मात्र वर्षअखेरीस प्रशासनाने सादर केलेला मूळ अर्थसंकल्पच योग्य असल्याचे स्पष्ट होते, असे अनिल सावंत यांनी आकडेवारीनिशी सभागृहात दाखवून दिले. काँग्रेसचे गटनेते जुबेर इनामदार यांनी भाजपने मांडलेल्या प्रस्तावाच्या विरोधात सभागृहात प्रस्ताव मांडला. त्यात आवश्यक त्या ठिकाणी उत्पन्नवाढ आणि अनावश्यक खर्चावर कपात करण्याच्या मुद्द्यांचा समावेश करण्यात आला होता; मात्र भाजपने बहुमताच्या जोरावर आपला प्रस्ताव मंजूर करवून घेतला.
नगरसेवकांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन
कोव्हिड साथ ओसरली असल्यामुळे तब्बल दोन वर्षांनी महापालिकेची महासभा प्रथमच ऑफलाईन पद्धतीने सभागृहात पार पडली. त्यामुळे प्रशासनाकडून नगरसेवकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, तसेच सभागृहाच्या प्रवेशद्वारावर रांगोळी काढून आकर्षक सजावट करण्यात आली होती. कोविड काळात विशेष कामगिरी केल्याबद्दल आयुक्त दिलीप ढोले, महापौर ज्योत्स्ना हसनाळे आणि उपमहापौर हसमुख गेहलोत यांचा सभागृहाच्या वतीने विशेष सत्कारही या वेळी करण्यात आला.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..