भूलतज्ज्ञांअभावी शस्त्रक्रियांची रखडपट्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भूलतज्ज्ञांअभावी शस्त्रक्रियांची रखडपट्टी
भूलतज्ज्ञांअभावी शस्त्रक्रियांची रखडपट्टी

भूलतज्ज्ञांअभावी शस्त्रक्रियांची रखडपट्टी

sakal_logo
By

भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : पाठीचा कणा वाकल्याची म्हणजेच स्कोलोसिसची तक्रार घेऊन सिंधुदुर्गातील सुकन्या ताम्हाणे (नावात बदल) ही ११ वर्षांची मुलगी मुंबईच्या जीटी म्हणजेच गोकुळदास तेजपाल या सरकारी रुग्णालयात ७ मार्च या दिवशी दाखल झाली. सर्व तपासण्या झाल्यानंतरही अद्याप तिची शस्त्रक्रिया रखडली आहे. तसेच रायगड येथील १३ वर्षीय कोमल साबळे (नावात बदल) हिच्यावर २०१७ पासून स्कोलोसिसच्या चार शस्त्रक्रिया झाल्यात. तिचीही शेवटची शस्त्रक्रिया अद्याप झालेली नाही. अशाप्रकारे आणखी दोन रुग्ण जीटी रुग्णालयात शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. या सर्व शस्त्रक्रिया रखडण्याचे कारण म्हणजे रुग्णालयात भूलतज्ज्ञच उपलब्ध नसल्याची तक्रार रुग्णांच्या नातेवाईकांनी मंगळवारी जेजे रुग्णालय समूहाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांना दिली. लवकरच यावर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन डॉ. सापळे यांनी दिले.
जीटी रुग्णालय हे स्कोलोसिसवरील सुप्रा मेजर म्हणजेच अवघड शस्त्रक्रिया करणारे राज्यातील एकमेव शासकीय रुग्णालय आहे. मोफत आणि चांगल्या शस्त्रक्रिय होत असल्याने देशभरातून अनेक जण जीटी रुग्णालयात येत असतात. गेल्या पाच वर्षांत रुग्णालयात ४५ सुप्रा मेजर शस्त्रक्रियांसह पाठीच्या कण्यासंदर्भातील जवळपास ६०० यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या; मात्र सध्या जीटी रुग्णालयात भूलतज्ज्ञच उपलब्ध नसल्याने अनेक शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. त्यामुळे देशभरातून आलेल्या रुग्णांसह नातेवाईकांची गैरसोय होत आहे.
----
जे.जे.त जाण्याची वेळ
जीटी रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात यापूर्वी एक भूलतज्ज्ञ होते; मात्र कामाचा मोबदला कमी मिळत असल्याने त्यांनी रुग्णालयात येणे बंद केले. प्रसंगी इतर शस्त्रक्रियेसाठी जे.जे. रुग्णालयातून भूलतज्ज्ञ पाठवले जातात, पण आता तेही पाठवले जात नाही. त्यामुळे जीटीतील अनेक रुग्णांना जे.जे. रुग्णालयात पाठवण्याची वेळ येते. दरम्यान, खासगी रुग्णालयात या शस्त्रक्रियेसाठी तब्बल १५ ते २० लाख रुपयांचा खर्च येत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
---
नऊ रुग्ण प्रतीक्षा यादीत
भूलतज्ज्ञांअभावी शस्त्रक्रिया रखडल्याने रुग्णांची प्रतीक्षा यादी वाढत आहे. वरील चार रुग्णांव्यतिरिक्त आणखी नऊ जण प्रतीक्षा यादीत आहेत. शस्त्रक्रियेसाठी जीटी रुग्णालय सज्ज असले, तरी भूलतज्ज्ञांअभावी सर्वच शस्त्रक्रिया आणि रुग्णांचे प्रवेशही रखडले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..