
ठाणेकरांवर पाणीबाणीचे संकट; पुन्हा ऐन उन्हाळ्यात टंचाईचे चटके बसणार
ठाणे : शहापूर तालुक्यातील भातसा धरणातून (Bhatsa Dam) पाणी सोडणाऱ्या दरवाजामध्ये बिघाड (Technical problem in Door) झाल्याने मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पाणीटंचाईला (water scarcity) सामोरे जाणाऱ्या ठाणेकरांना पुन्हा ऐन उन्हाळ्यात टंचाईचे चटके बसणार आहेत. भातसा धरणातून ठाण्याला पुरवठा होणाऱ्या पाण्याचा विसर्ग (water supply) दोन दिवस रोडावल्यामुळे, तसेच भातसा ते पिसे बांधाऱ्यापर्यंत नदीमार्गे ५० किलोमीटरचा पल्ला गाठेपर्यंत कडक उन्हामुळे (Summer hit) पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होते.
हेही वाचा: रायगड: ज्ञानाची पातळी उंचावण्यासाठी वाचन गरजेचे; 'सकाळ'मार्फत मार्गदर्शन शिबिर
त्यामुळे बंधाऱ्यातील पाण्याची पातळी खालावली आहे. ही पातळी पूर्ववत होण्यास आणखी दोन दिवसांचा कालावधी लागणार असल्याने ठाणेकरांवर पाणीबाणीचे संकट ओढावले आहे.
ठाणे महापालिका भातसा धरणातून २२० एमएलडी एवढे पाणी उचलते. तसेच स्टेम प्राधिकरणाकडून ११५ एमएलडी, तर एमआयडीसीकडून १२० एमएलडी पाणीही शहराला मिळते. भातसा धरणातून मिळणारे पाणी पडघ्याजवळील (ता. भिवंडी) पिसे बंधाऱ्यात साठवून पुढे टेमघरला शुद्धीकरण केले जाते, त्यानंतर ठाणे शहर, वागळे, घोडबंदर आदी भागांतील रहिवाशांची तहान भागवते; मात्र गेल्या दोन महिन्यांपासून या पाणीपुरवठ्याला ग्रहण लागले आहे.
२९ फेब्रुवारीला भातसा धरणाच्या दरवाजामध्ये बिघाड झाल्यामुळे पाणीपुरवठा ५० टक्क्यांवर आला. त्यामुळे ११ मार्चपर्यंत ठाणेकरांना निम्म्या पाण्यावर समाधान मानावे लागले. हा पाणीपुरवठा सुरळीत होऊन २५ दिवस उलटत नाही तोच भातसा धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग रोडावल्याने टंचाईचे संकट ओढावले आहे.गेल्या काही दिवसांपासून तापमान ४० अंशांपार गेल्यामुळे उन्हाचे चटके वाढू लागले आहेत.
हेही वाचा: लाल मिरचीला महागाईचा तडका; घरगुती मसाल्याला ग्राहकांची पसंती
त्यामुळे धरणांमधील पाण्याची पातळीही कमी होऊ लागल्याने भातसा धरणातून दोन दिवसांपासून पाण्याचा पुरवठा मंदावल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच धरण ते पिसे बंधाऱ्यापर्यंत पाणी पोहोचवण्याचे अंतर ५० किलोमीटर इतके आहे. हा मार्ग पार करताना मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन होते. त्यामुळे धरणातून सोडण्यात येणारे पाणी बंधाऱ्यात येईपर्यंत त्याची मोठ्या प्रमाणात वाफ होत असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. परिणामी पिसे बंधाऱ्याच्या पाण्याच्या पातळीत घट झाली आहे.
दृष्टिक्षेप
- पिसे बंधाऱ्याची उंची ३४ ते ३५ मीटर इतकी आहे.
- भातसातून येणाऱ्या पाण्याचे वितरण सतत सुरूच असते.
- पातळी स्थिर राहते आणि जादा पाणी भातसा नदीत साठून राहते.
- धरणातून कमी पाणी सोडल्याने पिसे बंधाऱ्याची पातळी ३१ मीटरने खालावली.
- पाण्याची पातळी खालावल्याने पम्पिंग करण्यास अडचण येत आहेत.
- यंदाच्या उन्हाळ्यात प्रथमच पातळी ३१ मीटरवर आली आहे.
दोन दिवसांनी पुरवठा सुरळीत
पिसे बंधाऱ्याची पातळी कमी होताच भातसा धरणाच्या संबंधित यंत्रणेशी ठाणे महापालिकेने संपर्क साधला आहे. त्यांनीही पिसे बंधाऱ्याची पाहणी केल्यानंतर आता विसर्ग वाढवण्यास सुरुवात केली; मात्र ५० किलोमीटरचे अंतर गाठून पाण्याची पातळी गाठण्यास आणखी १५ ते २० तास लागण्याची शक्यता असल्याची माहिती ठाणे पालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हनुमंत पांडे यांनी दिली. पाहणीच्या वेळी बंधाऱ्याची पातळी वाढल्याचे दिसून आले असून लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..