pregnency
pregnencysakal

''अंतरा''ने वाढवले गर्भधारणेतील अंतर

‘अंतरा’ हे गर्भनिरोधक इंजेक्शन

मुंबई : पाळणा लांब‍वण्यासाठी आतापर्यंत उपलब्ध असलेल्या वैद्यकीय पर्यायांमध्ये राज्य सरकारने ‘अंतरा’ हे गर्भनिरोधक इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहे. कुटुंब नियोजनासाठी या इंजेक्शनचा वापर कितपत प्रभावी ठरेल, यासंदर्भात अनेक शंका-कुशंका उपस्थित करण्यात आल्या; मात्र पाच वर्षांत मुंबईतील १५ हजार २८४ महिलांनी या गर्भनिरोधक इंजेक्शनचा वापर केल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली आहे. त्यामुळे ‘अंतरा’ इंजेक्शनने गर्भधारणेतील अंतर वाढवण्यास मदत झाल्याचे पालिकेच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे असून, यातून मुंबईत जन्मदर घसरल्याचे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

एका अपत्यानंतर लगेच दुसरे अपत्य होऊ नये म्हणून अनेकदा गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या जातात किंवा सुरक्षितता म्हणून कधी कधी कंडोम वापरला जातो. पण आता ‘अंतरा’ इंजेक्शनसह ‘कॉपर टी’ बसवण्याच्या प्रमाणात बऱ्यापैकी वाढ झाली आहे. यातून नको असलेली गर्भधारणा टाळता येते व गर्भपाताचे प्रमाणही कमी होते.
मुंबईत दरवर्षी किमान दीड लाख मुले जन्माला येतात, पण २०२१-२२ चा अहवाल पाहिल्यास दीड लाखांच्या तुलनेत आता जवळपास ३० हजार जन्म कमी झाले असून सुमारे एक लाख २० हजार मुले जन्माला येत आहेत. याचाच अर्थ कुटुंब नियोजन सुविधांचा वापर कमी झाला असला तरी २०२१-२२ मधील मुंबईतील जन्मदर हा आधीच्या तुलनेत कमी पाहायला मिळतो. म्हणजेच आता मुंबईतील नागरिक कुटुंब नियोजन सुविधांसह ज्या तात्पुरत्या इतर सुविधा उपलब्ध आहेत, त्याचा वापर करत आहेत.

कसे आहे ‘अंतरा’?
१) मुंबईतील सार्वजनिक व पालिका रुग्णालयांमध्ये ‘अंतरा’ निशुल्क दिले जाते. २०१७ पासून अंतरा हे इंजेक्शन वापरात आहे. तोंडावाटे घ्याव्या लागणाऱ्या औषधांचे दुष्परिणाम दिसून येतात; मात्र ‘एमपीए’ या इंजेक्शनचा वापर मासिक पाळी सुरू झाल्यानंतर अथवा गर्भपातानंतर सात दिवसांच्या आत करता येतो.
२) प्रसूतीनंतर सहा आठवड्यांनी हे इंजेक्शन घेतल्यास पुढील प्रसूतीही टळू शकते. १८ ते ३५ वयोगटातील महिलांना हे इंजेक्शन देण्यात येते. तीन महिन्यांपर्यंत या इंजेक्शनचा प्रभाव राहतो. पुन्हा तीन महिन्यांनी इंजेक्शन घ्यावे लागते.

पालिका आणि सरकारी रुग्णालयात दिलेले इंजेक्शन
वर्ष अंतरा (पालिका व सरकारी) कॉपर टी
२०१७-१८ ५,४६७ ४७,५८६
२०१८-१९ ५,०१६ ४५,०४४
२०१९-२० २,१८२ ३९,६०४
२०२०-२१ ५६८ ४२,००७
२०२१-२२ २,०५१ (फेब्रुवारीपर्यंत) ४१,४६५ (मार्चपर्यंत)

इंजेक्शनचा वापर वाढावा यासाठी प्रयत्नशील
१) गर्भपात करण्यापेक्षा गर्भनिरोधकांचा वापर वाढावा यादृष्टीने कुटुंब कल्याण विभागाने या इंजेक्शनच्या वापरासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू केले आहेत. पालिकेची रुग्णालये, प्रसूतिगृहे, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये हे इंजेक्शन मोफत दिले जाते.
२) इंजेक्शनचा वापर थांबवल्यानंतर सात ते १० महिन्यांनी पुन्हा गर्भधारणा होऊ शकते. प्रसूतीनंतरच्या कालावधीमध्ये स्तनदा मातांसाठीही ते उपयुक्त आहे. हे इंजेक्शन वापरल्यानंतर शारीरिकदृष्ट्या कोणतेही दुष्परिणाम जाणवत नाहीत. त्यामुळे हे इंजेक्शन सुलभ असल्याचे स्त्री-रोगतज्ज्ञ सांगतात.

‘कॉपर-टी’चाही वापर
१) चुकून गर्भधारणा झाली तर काय, अशी चिंता महिलांना नेहमी सतावत असते. यासाठी बाजारात अनेक प्रकारची गर्भनिरोधक औषधे आणि उत्पादने उपलब्ध असली तरी ती थोडी महाग आणि कमी प्रभावी आहेत. त्यामुळे जर महिलांना कोणत्याही प्रकारच्या औषधांच्या त्रासापासून दूर राहायचे असेल तर कॉपर-टी बसवणे हा एक प्रभावी मार्ग असू शकतो.
२) कॉपर-टीचा आकार ‘टी’ या इंग्रजी अक्षरासारखा आहे, ज्यामध्ये एक प्लास्टिकचा रॉड असतो. त्याचा काही भाग तांब्याचा असतो. वास्तविक तांबे शुक्राणूंना मारण्याचे काम करते आणि शुक्राणूंशिवाय गर्भधारणा अशक्य आहे. त्यामुळे कॉपर-टी ९९ टक्के प्रभावी असल्याचे मानले जाते. कॉपर-टी १० वर्षे काम करू शकते. त्यामुळे कुटुंब कल्याण आणि नियोजनात नसबंदी, कॉपर-टी आणि अंतरा इंजेक्शन ही दिले जाते. ज्याचा एक ठराविक कालावधी असतो.

दोन लाखांहून अधिक महिलांनी...

१) २०१७ ते २०२२ च्या मार्च या कालावधीत मुंबईतील दोन लाख १५ हजार ७०६ महिलांनी कॉपर-टी बसवून घेतली आहे.
२) दरवर्षी सरासरी ४० हजार महिलांनी कॉपर-टी बसवण्यात पुढाकार घेतल्याचे पालिका अहवालावरून स्पष्ट होते.

नको असलेली गर्भधारणा रोखण्यासाठी तात्पुरत्या पर्यायांचा वापर वाढला आहे. यातून गर्भधारणा टाळता येते व गर्भपाताचे प्रमाणही कमी होते.
- डॉ. वैशाली चंदनशिवे, विशेष अधिकारी, कुटुंब कल्याण विभाग, मुंबई महापालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com