कोळ्यांची अनोखी दुनिया

कोळ्यांची अनोखी दुनिया

अमित गवळे, पाली
सध्या जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारच्या कोळ्यांच्या प्रजाती व त्यांची आकर्षक जाळी दृष्टिक्षेपात येत आहेत. विशेष बाब म्हणजे निसर्ग व कीटक अभ्यासक व प्रेमींना यांचे निरीक्षण व अभ्यास करणे सोपे जात आहे. या कोळ्यांची आकर्षक, आकाराने मोठी जाळी आणि रुबाबदार रंगीत कोळी येणाऱ्यांचे लक्ष वेधतात. जंगलात सर्रास आढळणारे हे कोळी रस्त्याच्या कडेला झाडे व झुडपात पाहिल्यावर सर्वसामान्यांसाठी कुतूहलाचा विषय ठरत आहेत.
एरवी जंगलात आढळणारे हे कोळी हिवाळ्यामध्ये भक्ष्य कीटक मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांवर व झुडपांमध्ये सहज दृष्टिक्षेपात पडत आहेत. निसर्ग अभ्यासक व तज्‍ज्ञ यांनी सांगितले, कोळ्यांचे विविध प्रकार आहेत. वर्गवारी त्यांच्या जाळे विणण्याच्या पद्धतीवरून केली जाते. पोकळीमध्ये जाळे विणणारा कोळी (जायंट वूड स्पायडर) ही कोळ्यांची जात सर्वसामान्य आहे. वातावरणातील बदलांचा त्यांच्यावर फारसा परिणाम होत नाही. फक्त जंगले वाचली पाहिजेत. यामध्ये मादी मोठी असते आणि नर एकदम छोटा असतो. कालांतराने ती नराला खाऊन टाकते. यांचे जाळे खूप मोठे असते. फनेल वेब स्पायडर हा कोळी नरसाळ्यासारखे आकर्षक जाळे विणतो आणि त्यामध्येच भक्ष्य पकडतो.

परदेशी कोळी
कोळी हा संधिपाद संघातील अ‍ॅरॅक्निडा वर्गाच्या अ‍ॅरेनीइडा या गणात समाविष्ट असलेला आणि रेशीमसारखा धागा तयार करणारा एक अष्टपाद प्राणी आहे. जगात कोळ्यांच्या सुमारे ६० हजार ज्ञात जाती आहेत. प्रामुख्याने हे भूचर असले तरी त्यांच्या काही जाती सागरकिनारी पाण्यालगत आणि युरोपिअन पाणकोळी ही गोड्या पाण्यात आढळते.

वैशिष्ट्ये
प्रामुख्याने कीटक भक्ष्य मिळू शकतात, अशा ठिकाणी कोळी आढळतात. वनात, शेतीच्या क्षेत्रात, घरात, वाळवंटात, दलदलीच्या प्रदेशात, उंच पर्वतावर, खोल खाणींमध्ये आणि अंधाऱ्या गुफांमध्येही कोळी आढळतात.
कोळी अन्नाशिवाय पुष्कळ दिवस जगू शकतात. त्यांना आपल्या शरीरात पुष्कळ अन्न साठवून ठेवता येते.
काही कोळी टाचणीच्या डोक्याइतके लहान असतात, तर दक्षिण अमेरिकेतील टॅरांटुला जातीचे काही कोळी पाय पसरले असता २५ सेंमी. इतके मोठे असतात.
कोळी बहुधा करड्या, तपकिरी किंवा काळ्या रंगाचे असतात; पण काही कोळी फुलपाखरांप्रमाणे आकर्षक रंगांचेही असतात.
बहुतेकांचे शरीर केसाळ असते. हे केस आखूड आणि अतिशय संवेदी असतात.

दोन प्रमुख प्रजाती
नरसाळ्यासारखे जाळे विणणारा कोळी (फनेल वेब स्पायडर), जंगलातील झाडांच्या खोडातील पोकळीमध्ये जाळे विणणारा कोळी (जायंट वूड स्पायडर) मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत.

असे पकडतो भक्ष्य
कोळी बरेच दिवस अन्न-पाण्याव्यतिरिक्त राहू शकतात. अन्न पचवण्याची त्यांची वेगळी पद्धत आहे, ज्यात कोळी आपले पाचक रस आपल्या भक्ष्यात सोडतात आणि मग विघटित झालेले द्रव रूपातील अन्न शोषून घेतात.

कोळ्यांना सध्या त्यांचे खाद्य कीटक व पतंग मोठ्या प्रमाणात मिळत आहे. हे कोळी वर्षभर भारतात सर्वत्र आढळतात. निसर्गच संरक्षित असल्याने त्यांना संरक्षणाची आवश्यकता नाही. मात्र वणवे व जंगलतोड यावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे.
- शंतनु कुवेसकर, वन्यजीव अभ्यासक, रायगड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com