सार्वजनिक रहदारीचा मार्ग गेट टाकून अडविला, | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सार्वजनिक रहदारीचा मार्ग गेट टाकून अडविला,
सार्वजनिक रहदारीचा मार्ग गेट टाकून अडविला,

सार्वजनिक रहदारीचा मार्ग गेट टाकून अडविला,

sakal_logo
By

अडूळसे गावातील रहदारीचा मार्ग अडविला
तहसीलच्या अधिकाऱ्याला केराची टोपली

पाली, ता. १ (वार्ताहर)ः खासगी विकसकाने खोटी कागदपत्रे सादर करून अनधिकृत गेट उभे करून सुधागड तालुक्यात अडूळसे ग्रामपंचायतीतील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या वाहतुकीचा रस्‍ता अडवला आहे. याबरोबरच शस्‍त्राचा धाक दाखवून ग्रामस्थांना वेठीस धरले आहे. या विरोधात ग्रामस्थांनी संबंधित तहसील कार्यालयात धाव घेतली आहे. त्यांनी गेट काढण्याचे आदेश दिले, मात्र या आदेशाला संबंधित विकसकाने केराची टोपली दाखवली आहे. परिणामी ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
सुधागड तालुक्यात अडूळसे ग्रामपंचायतीमधील शरदनगर, गौळमाळ, धनगरवाडा, गौळमाळ ठाकूरवाडी, पायरीची वाडी येथील ग्रामस्थ आणि शेतकरी अनेक वर्षे गावाकडे ये-जा करण्यासाठी या रस्‍त्‍याचा वापर करतात. पण काही दिवसांपूर्वी स्वतः ला रिटायर्ड कॅप्टन सांगणारे रणजित प्रधान यांनी रायगड पाटबंधारे विभागाकडे खोटी कागदपत्रे सादर करून फ्रान्सिस वर्गीस यांच्या मालकी हक्काच्या जागेतून जाणाऱ्या मार्गावरील पुलाचे काम स्वखर्चाने करून प्रशासनाची फसवणूक केली आहे. मात्र फ्रान्सिस वर्गीस यांनी संबंधित गेटवर आपला कोणताही संबंध नाही, ते आपण उभारले नाही अथवा कुणालाही याबाबत संमती दिली नसल्‍याचे ग्रामपंचायतीला कळवले असता रणजित प्रधान यांनी दमदाटी करून शस्‍त्राचा धाक दाखवून ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना धमकावत आहेत. या सर्व गोष्‍टींचा विचार करून, तत्कालीन कार्यकारी दंडाधिकारी, सुधागड यांनी, अडूळसे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकरिता अनधिकृत गेट तोडून रस्ता कायमचा मोकळा करण्यात यावा, असे आदेश दिले आहेत. मात्र प्रधान यांनी आदेश धुडकावत ग्रामस्थ, महिला, शेतकऱ्यांना शिवीगाळ करीत आहेत. त्‍यामुळे ग्रामस्‍थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

सात दिवसांनंतरही परिस्‍थिती जैसे थे
ग्रामस्थांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्याकडे लेखी तक्रार करून रणजित प्रधान यांच्या अत्याचारावर न्याय मिळावा तसेच शेतकऱ्यांच्या जमिनी अवैध खरेदी विक्री प्रकरणे थांबवावी यासाठी धाव घेतली होती. त्यानुसार चर्चा केली असता शासनाच्या आदेशाचे पालन करून सात दिवसांत गेट काढून रस्ता मोकळा करून देऊ, असे आश्वासन प्रधान यांनी दिले होते. मात्र सात दिवस उलटल्यानंतरही परिस्‍थिती जैसे थे आहे.


संबंधित आदेश माझ्या कार्यकाळातील नाहीत. हा आदेश पाहून तसेच स्थळ पाहणी करून या प्रकरणासंदर्भात सखोल माहिती घेणार आहे.
- उत्तम कुंभार, तहसीलदार, पाली-सुधागड

पूर्वापार रहदारीचा मार्ग बंद करून विकसकाने फसवणूक केली आहे. याबाबत तहसीलदारांना निवेदन दिले होते. त्यांनी गेट तोडून मार्ग मोकळा करण्याचे आदेश दिले होते. मात्र हे आदेश विकसकाने मानले नाहीत. परिणामी आम्ही न्यायासाठी तीव्र आंदोलन करणार आहोत.
- भाऊराव कोकरे, माजी सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत अडूळसे