
पाण्यासाठी महिलांसह ग्रामस्थ आक्रमक
पाण्यासाठी महिलांसह ग्रामस्थ आक्रमक
जिल्हा परिषद प्रशासनाच्या कारभाराबाबत संताप
अलिबाग, ता. ८ (बातमीदार) ः एमआयडीसीच्या जलवाहिनीवर बेकायदा टॅप मारून ठेकेदाराने जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मांडवखार येथे नळ पाणी पुरवठा योजना सुरू केली आहे. त्यामुळे वैजाळी, रेवस, शिरवली, मानकुळे व नारंगी ग्रामपंचायतीतील अनेक गावे, वाड्यांमधील पाच दिवसापांसून पाणीपुरवठा बंद आहे. ठेकेदाराच्या मनमानी कारभाराचा फटका जवळपास २५ हजार नागरिकांना बसल्याने परिसरातील महिला व ग्रामस्थ संतप्त आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांची भेट घेत बेकादेशीर जोडणी बंद करून ग्रामपंचायतींचा पाणी पुरवठा सुरळीत सुरु करावा व ठेकेदारावर कारवाई अशी मागणी करीत जिल्हा परिषद कार्यालयात महिलांसह ग्रामस्थांनी जमाव केला आहे. यावेळी पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला.
वैजाळी, रेवस, शिरवली, मानकुळे व नारंगी या ग्रामपंचायत हद्दीत 18 गावांचा समावेश आहे. या गावे, वाड्यांमध्ये सुमारे 25 हजार नागरिक आहे. या नागरिकांना एमआयडीसीमार्फत पाणी पुरवठा होत आहे. मात्र चिंचवली ग्रामपंचायत हद्दीत जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मांडवखार येथे नळपाणी पुरवठा योजना राबविण्यात आली. अर्णव इंटर प्रायझेस या एजन्सीमार्फत हे काम करण्यात आले. एजन्सीच्या ठेकेदाराने मनमानी कारभार करीत रेवस झोन 2 एमआयडीसीच्या पाईपलाईनमधून टॅप मारून बेकायदेशीर नळ कनेक्शन जोडले आहेत. त्याचा परिणाम अन्य ग्रामपंचायतीच्या हद्दीतील 25 हजार नागरिकांवर होऊ लागला आहे. या गावे, वाड्यांना मुबलक पाणी पुरवठा होत नाही. पाण्यासाठी गेल्या पाच दिवसांपासून वणवण करावी लागत आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत जाब विचारला असता, त्यांच्याकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महिला व ग्रामस्थांनी बुधवारी अलिबाग येथील जिल्हा परिषद कार्यालय गाठले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील मिटींगमध्ये व्यस्त असल्याने त्यांची भेट झाली नाही. त्यामुळे या महिलांसह ग्रामस्थांनी मिटींग असलेल्या सभागृहाबाहेर उभे राहून संताप व्यक्त केला.
या घटनेची माहिती अलिबाग पोलीसांना मिळताच त्यांनी घटना स्थळी धाव घेतली. संतप्त झालेल्या जमावाला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. एका बाजुला जलजीवन मिशनमार्फत हर घर जलचा बोलबाला होत असताना, दुसऱ्या बाजुला करताना, ज्यांना पाणी मिळते. तीच मंडळी पाण्यापासून वंचित असल्याचे समोर आले आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या या कारभारामुळे महिला व ग्रामस्थांमध्ये नाराजीचे सुर उमटत आहेत.
-------------------------
जलजीवन मिशन अंतर्गत मांडवखार येथे नळपाणी पुरवठा योजनेचे काम अर्णव इंटर प्रायझेस एजन्सीमार्फत केले आहे. ठेकेदाराने परस्पर एमआयडीसीच्या पाईपलाईनमधून बेकायदेशीररित्या टॅप मारून कनेक्शन टाकले आहेत. त्यामुळे वैजाळी, रेवस, शिरवली, मानकुळे, नारंगी ग्रामपंचायतींना गेल्या पाच दिवसांपासून पाणी पुरवठा होत नाही. पाण्यापासून वंचित राहवे लागत आहे. जोडलेले बेकायदेशीर कनेक्शन बंद करून ग्रामपंचायतीला सुरळीत पाणी पुरवठा करावा. व ठेकेदारावर कारवाई करावी तसेच संबंधित विभागाची परवानगी घेतल्याशिवाय पाईपलाईनवर ठेकेदार काम करणार नाही, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मच्छींद्र पाटील- सरपंच
ग्रुप ग्रामपंचायत रेवस
Remarks :