जंजिरा किल्ल्यात सौर ऊर्जेचा झगमगाट

जंजिरा किल्ल्यात सौर ऊर्जेचा झगमगाट

मुरूड, ता. १२ (बातमीदार) ः मुरूड येथील जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक येतात. चारही बाजूने पाण्याने वेढलेल्या या किल्ल्यात गेल्यावर भूभागाशी संपर्क पूर्णपणे तुटतो. त्‍यामुळे पर्यटकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पर्यटन विकास महामंडळाने येथे सौर उर्जेवर चालणारी पाणीपुरवठा यंत्रणा सुरू केल्‍याने पिण्याच्या पाण्यासह, शौचालये स्वच्छ ठेवण्यास मदत होत आहे. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी किल्ल्यात दिवाबत्तीचीही व्यवस्था झाली आहे.
किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या महिला पर्यटकांची स्वच्छतागृह नसल्‍याने गैरसोय व्हायची. पाणी नसल्याने स्वच्छतागृह अनेक वर्ष बंद होती. अखेर येथे सौर ऊर्जेवर चालणारी पाणी पुरवठा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. पाणी पुरवठा होऊ लागल्याने स्‍वच्छतागृहाची निगा राखणे शक्य होत आहे.
जंजिरा किल्ल्यात सौर उर्जेचे पॅनल लावून ३ किलो वॉट वीज निर्मिती केली जात आहे. या ऊर्जेवर बुकिंग यंत्रणा, कल्चर नोटीस बोर्ड, पाणी पुरवठा, रात्रीची दिवाबत्ती यासह कामासाठी लागणारी वेल्डिंग मशिन चालवता येत आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी सोयी-सुविधा उभारण्याच्या कामांना वेग आला आहे. त्‍यासाठी सुमारे १० लाखांचा निधी खर्च करण्यात आल्‍याची माहिती पुरातत्त्व विभागाचे अधिकारी बी.जी ऐलीकर यांनी दिली.
जंजिरा किल्ल्यात शुद्ध पाण्याची पुरातन विहीर आहे. पर्यटकांना हे पाणी शुध्द करून पिण्यासाठी देण्याची सुविधा लवकरच करण्यात येणार आहे. राजपुरी किंवा आगरदांडा येथून समुद्रातून वीज वाहिनी टाकणेही शक्य नव्हते. यामुळे पुरातत्व विभागाने सौर उर्जेचे पॅनल बसवून वीज पुरवठा सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वीच हे पॅनेल बसवण्यात आल्‍याने रात्रीच्या वेळीही आता जंजिरा किल्ल्यात लख्ख उजेड असतो.

जंजिरा किल्ल्यात जाण्याच्या मार्गावर लोखंडी ग्रील बसवल्यात आले आहेत, त्यामुळे गर्दी नियंत्रणात येण्यास मदत होते. तिकीटघरही आता ऑनलाईन यंत्रणेशी जोडण्यात आले आहे. किल्ल्याचे जतन होण्याबरोबरच किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना सोयीसुविधाही देणे गरजेचे होते, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सौर ऊर्जेचा प्रयोग यशस्वी होत असल्याने येथे अन्य सुविधाही उभारणे शक्य होणार आहे.
- बी.जी. ऐलीकर, संवर्धन साहायक, पुरातत्त्व विभाग, रायगड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com